हुक्केरी ः पुढारी वृत्तसेवा : दुचाकीला भरधाव जात असलेल्या ट्रॅक्टरची मागून धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर मागे बसलेल्या दोन महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी तालुक्यातील कोटबागी गावाजवळ घडली.
बाळप्पा शिवाप्पा हुबरट्टी (वय 32) रा. कोटबागी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी शांतव्वा बाळप्पा हुबरट्टी (वय 28), सिध्दव्वा धुळप्पा मालदिन्नी (वय 34) अशी जखमी महिलांची नावे आहेत. बैलगाडीला जोडलेला ट्रॅक्टरचालक निष्काळजीपणे वाहन चालवत असताना हा अपघात घडला. चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी महिला हुक्केरी शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आल्या आहेत.