संकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : भरवस्तीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोने व ५८ हजार रुपये लंपास केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास मनमाड गल्ली व पिंजार गल्लीत घडली. मनमाड गल्लीतील राजू घोरी हे नवीन घरात राहण्यास गेले होते. मात्र, त्यांनी साहित्य जुन्या घरात ठेवले होते.
चोरट्यांनी मध्यरात्री या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून सोन्याचे तीन तोळ्याचे दागिने व ५८ हजार रुपये लंपास केले. सकाळी घोरी चोरीची घटना उघडकीस आले. दुसऱ्या घटनेत पिंजार गल्लीतील शांता शिंदे यांचे घर फोडले. शिंदे या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. ही संधी पाहून चोरट्यांनी त्यांचे घर फोडूने १० हजार रूपये लंपास केले. तसेच मोकाशी गल्लीतील विष्णू नार्वेकर यांचा म्हशीचा गोठा व अंगणवाडी चोरीचा प्रयत्न केला. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास हाती घेतला आहे.