बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शौर्याने लढणारे देशाचे अद्वितीय वीरपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना आनंद होत आहे. राजहंसगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
गुरुवारी जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. अनुदानाचा उपयोग राजहंसगड किल्ल्यावरील कम्युनिटी हॉल, विश्रामगृह तसेच इतर मुलभूत सुविधा निर्माण करून पर्यटन स्थळात रूपांतरित करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, राजहंसगड हा शिवाजी महाराजांचे गतवैभव आणि संस्कृती जपणारा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाने पाहिलेले सर्वात महान राजे आहेत. मुघल आणि परकीयांच्या राजवटीत त्यांनी हिंदू साम्राज्य निर्माण करण्यासाठी लढा दिला. परकीयांच्या महाकाय सैन्याला धैर्याने, शौर्याने पराभूत करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच शस्त्रास्त्रांमध्ये ताकद असल्याचे त्यांनी आपल्या सैन्याला दाखवून दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 2008 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी 14 कोटी रुपये मंजूर केले होते. संजय पाटील यांच्या प्रयत्नातून किल्ल्याच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आले. आता किल्ल्याच्या विकासासाठी आधीच राखून ठेवलेल्या अनुदानाव्यतिरिक्त 5 कोटींचे अतिरिक्त अनुदान देण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगारा वाजवून अनावरण केले. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगल अंगडी, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, अभय पाटील, प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ कन्नड, सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री उपस्थित होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वागत केले.
राजहंसगडारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. गुरुवारी (दि. 2) भाजपने सरकारी कार्यक्रम जाहीर करत पुतळ्याचे अनावरण केले. आता आमदार लक्ष्मी हेब्बाळकर रविवारी (दि. 5) पुतळ्याचे उद्घाटन करणार आहेत.
2013 ते 2018 सालापर्यंत राज्यात काँग्रेस सरकार होते. राजहंसगडाच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि किल्ला परिसर विकासासाठी एक रुपयाही दिलेला नाही. जर काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात राजहंसगडाच्या विकासासाठी एक रुपया जरी दिला असेल तर त्यांनी ते सिद्ध करून पुन्हा उद्घाटन करावे आमची काही हरकत नाही, असे आव्हान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.