बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटकातून राज्यसभेसाठी निवडल्या जाणार्या चार खासदारांपैकी तीन जागा भाजपने पटकावल्या आहेत, तर एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. निजदला एकही जागा जिंकता आली नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते जग्गेश आणि लेहर सिंग यांनी भाजपकडून विजय मिळवला. तर काँग्रेसकडून जयराम रमेश विजयी ठरले. विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. विधानसौधमधील मतदान केंद्रात सकाळी आमदारांनी रांग लावली होती. सायंकाळी निकाल जाहीर झाला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य सभेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला 3 जागांवर तर काँग्रेसला एक जागेवर विजय मिळाला आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार 2 जागा भाजपला आणि एक जागा काँग्रेसला मिळणार हे निश्चित होते. चौथ्या जागेसाठी चुरस होती. तिथे भाजपने बाजी मारली.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (46 मते ), अभिनेते भाजप उमेदवार जग्गेश (44), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (46) यांना प्रथम पसंतीची मते मिळाली. ही मते सर्वाधिक असल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. तर दुसर्या पसंतीच्या मतदानात भाजप उमेदवार लेहर सिंग (32) यांनी मते घेऊन बाजी मारली. तर काँग्रेस उमेदवार मन्सूर अली खान (25), निजद उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांनी (30) मते घेतली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.
अपक्ष, बसप भाजपकडे
एक अपक्ष आमदार एच. नागेश व बसपचे आमदार एन. महेश यांनी भाजपला मतदान केल्याचे समजते. त्यामुळे तिसर्या जागेवर भाजपला विजय मिळवता आला. दुसर्या पसंतीच्या मतदानाबाबत निजद व काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. एकमेकाला सहकार्य करण्यावरुन दोन्ही पक्षांनी परखड भूमिका घेतली होती.
निजदचे कोलारचे आ. श्रीनिवास गौडा यांनी पक्षादेश डावलून काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. ते काँग्रेस नेत्यांच्या वाहनातूनच मतदान केंद्रावर आले होते. तसेच मतदान करून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी काँग्रेस नेत्यांसमवेत विजयाची खूण दाखवली.
त्याचबरोबर निजदचे आमदार जी. टी. देवेगौडा, शिवलिंगेगौडा, एम. टी. रामस्वामी यांच्यासह 6 ते 8 आमदारांनी पक्षादेश डावलून काँग्रेस उमेदवाराला मतदान केले असण्याची शक्यता आहे.
मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत होते. मात्र बहुतेक आमदारांनी दुपारी 1 पर्यंत मतदान केले होते. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार होती. मात्र, मतदानावरुन भाजप व काँग्रेसकडून स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्याने मतमोजणी प्रक्रियेला विलंब झाला. रेवण्णा यांनी मतदानाचा हक्क बजावताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना आपली मतपत्रिका दाखवून मतदान केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तसेच त्यांचे यांचे मत अवैध ठरवा, अशा मागणीचे निवेदन नेत्यांनी निवडणूक अधिकार्यांना दिले. नियमानुसार मतदान करताना आपल्या पक्षाच्या एजंटांनाच मतपत्रिका दाखवणे आवश्यक असते. असे असताना इतर पक्षाच्या एजंटाना ती दाखविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र निवडणूक अधिकार्यानी रेवण्णा यांचे मतदान वैध ठरवले.