बेळगाव

मिरजेच्या तरुणाकडून विवाहिता ब्लॅकमेल

Arun Patil

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : नात्यातीलच तरुणाने विवाहित महिलेचा मानसिक छळ करून तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात त्या तरुणाला त्याचा भाऊ आणि भावजयीनेही साथ दिली आहे. या प्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

विवाहिता हुबळीची असून,तिच्या तक्रारीनंतर हुबळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ब्लॅकमेलर तरुणाचे नाव सुनील संभाजी डोरकर (वय 42) असे असून, त्याचा मोठा भाऊ परशुराम संभाजी डोरकर (57), भावजय सुरेखा परशुराम डोेरकर (53, तिघेही रा. मिरज) तसेच सुरेखाची बहीण सरिता महेश कदम व तिचा पती महेश कदम (दोघेही रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण विवाहित महिलेच्या भावाच्या सासरचे नातेवाईक आहेत.

घटप्रभा येथील 22 वर्षीय तरुणीचा हुबळी येथे विवाह झाला असून या दांपत्याला दोन वर्षाचा मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी ती भावाच्या मुलाच्या बारशाला घटप्रभा येथे आली असता भावाचे सासर असलेल्या मिरज (जि. सांगली) येथील मंडळींशी तिची ओळख झाली.

मुख्य संशयित सुनील डोरकर याने पीडित महिलेच्या भावाला सगळेच विशाळगडला जाऊ असे सांगत तुमच्या बहिणीच्या कुटुंबालाही बरोबर घ्या, असे सांगितले. तेथे सर्वांनी मिळून भाडोत्री घर घेतले. सगळे फिरावयास गेले. मात्र सुनील स्वतः पोटदुखीचे कारण सांगत घरीच थांबला. यानंतर त्याने सदर विवाहितेचा मोबाईल घेऊन त्यावरून आपल्याला हवे तसे मेसेज व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवून घेतले. यामध्ये अनेक अश्लील मेसेज पाठवले. यानंतर त्याचा स्क्रीन शॉट घेत ते मेसेज विवाहितेच्या मोबाईलवरून डिलीट केले.

त्यानंतर सुनीलने काही दिवसात सदर विवाहितेशी अश्लील बोलण्यासह ब्लॅकमेलिंगची भाषा बोलू लागला. मी म्हणेल तसे नाही वागलीस तर मुलगा, पती व सासरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकीही सुनीलने दिली. त्यानंतर त्याने आपल्या वहिनीची कोल्हापूर येथील बहीण सरिता कदम व तिचा नवरा महेश यांना सोबत घेऊन निपाणी गाठले. तेथून त्यांनी एक भाडोत्री वाहन घेऊन हुबळी गाठले.त्यानंतर त्यांनी त्या विवाहितेला घरातून दागिने व घराची सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले. विवाहितेने तसे केल्यानंतर विवाहिता आणि तिच्या मुलाला त्या तिघांनी गाडीत घालून नेले.

विवाहितेचा पती घरी परतल्यानंतर त्याने शोधाशोध केली. पण पत्नी व मुलगी दिसेना. त्यानंतर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद हुबळी पोलिसांत दिली. आठ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी विवाहितेची मिरजमधून सुटका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT