बेळगाव

मराठीबाबत पीएमओकडूनही सूचना

अमृता चौगुले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून परिपत्रके मिळावीत यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) कर्नाटकाच्या मुख्य सचिवांना करण्यात आली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठीतून परिपत्रके देण्यात यावीत, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकार्‍यांसह पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आदींना पत्र पाठवून केली होती. त्याची पीएमओकडून दखल घेण्यात आली आहे.

बेळगाव व सीमाभागात कन्‍नडसक्‍ती करण्यात येत आहे. सर्व फलक कन्‍नडमध्ये लावले जात असून आवश्यक माहिती कन्‍नडमध्ये दिली जाते. त्यामुळे म. ए. समितीने 27 जून रोजी विराट मोर्चाची घोषणा केली आहे. त्याची जनजागृती सुरू आहे. आता पंतप्रधान कार्यालयाने मराठीच्या मागणीची दखल घेतली आहे.पंतप्रधान कार्यालयाचे विभागीय अधिकारी विवेक प्रकाश यांनी कर्नाटकाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून मराठी भाषिकाना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आवश्यक ती पावले उचलावित, अशी सूचना केली आहे. या पत्राची प्रत म. ए. समिती खजिनदार प्रकाश मरगाळे यांना पाठवली आहे.

मराठीतून परिपत्रकांच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. आता कर्नाटक सरकारने त्याची अंमलबजावणी करावी.
– प्रकाश मरगाळे,
खजिनदार, मध्यवर्ती समिती.

SCROLL FOR NEXT