बेळगाव

बेळगावसह उत्तर कर्नाटकाला ठेंगाच; तरीही सभापती म्हणतात अधिवेशन यशस्वी

मोहन कारंडे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगावच्या औद्योगिक विकासाबाबत ठोस निर्णय नाही, उत्तर कर्नाटकात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजासाठी आरक्षण वाढवण्याबाबत निर्णय नाही, बेळगावच्या पाणीप्रश्नावर तोडगा नाही. उत्तर कर्नाटकासाठीही भरीव असे काहीच नाही. तरीही हे सारे अपयश बाजूला ठेवत कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचा दावा विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शुक्रवारी केला. सुवर्णसौधमध्ये अधिवेशन 9 दिवस चालले, कामकाज 41 तास 20 मिनिटांचे झाले, एकूण 12 विधेयके मांडण्यात आली, पैकी 9 विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामुळे हे अधिवेशन यशस्वी झाले असे सभापती म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कागेरी बोलत होते. विधानसभेच्या सचिव एम. के. विशालाक्षी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलिस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील होते. कागेरी म्हणाले, अधिवेशन 19 ते 29 डिसेंबर असे 9 दिवस चालले. कैद्यांची मान्यता (कर्नाटक सुधारणा) विधेयक, 2021 मागे घेण्यात आले. राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर केला.

उत्तर कर्नाटकच्या विकासावर विशेष चर्चा झाल्याचा दावाही सभापतींनी केला. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीसह विविध समित्यांचे 8 अहवाल सभागृहात मांडण्यात आले. 106 वार्षिक अहवाल आणि 122 लेखापरीक्षण अहवाल सभागृहात मांडण्यात आले, असे ते म्हणाले. एकूण 2 हजार 125 प्रश्न प्राप्त झाले. 150 प्रश्नांपैकी 146 प्रश्नांची उत्तरे सभागृहात देण्यात आली. 1 हजार 923 लिखित प्रश्नांपैकी 1 हजार 614 प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. 289 लक्षवेधी सूचनांपैकी 85 सूचनांवर चर्चा करून सादरीकरण करण्यात आले. शून्य वेळेत एकूण 40 सूचनांवर चर्चा झाली.

विश्वेश्वर हेगडे-कागेरी म्हणतात…

  • अधिवेशनात उत्तर कर्नाटकवर पुरेशी चर्चा
  • 74 टक्के आमदारांची उपस्थिती
  • 9 आमदार न सांगता गैरहजर
  • आमदार निवास बांधण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार
  • अधिवेशनात सत्तारुढ आणि विरोधकांचे उत्तम सहकार्य
  • निवास, भोजन, वाहतूक, पार्किंगची चांगली व्यवस्था
  • खर्चाची बिले लवकर अदा करण्यासाठी सूचना करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT