बेळगाव

बेळगाव : ‘हर घर तिरंगा’ फडकवायचा कसा?

दिनेश चोरगे

खानापूर; वासुदेव चौगुले :  अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येत आहे. पण ध्वजारोहणाची पद्धत आणि कार्यवाही बाबत लोकांच्या मनात अनेक शंका असून त्या दूर करण्यास अधिकारी आणि प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने तिरंगा फडकवू पण फडकविण्याच्या मार्गसूचीचे काय? अशी विचारणा नागरिकांतून केली जात आहे. जनतेच्या मनात असलेले संभ्रम दूर करून सरकारने लवकरच स्पष्ट सूचना द्याव्यात. अशी मागणी सर्वसामान्यतून केली जात आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून जनतेला घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारने ध्वज पुरवठा करण्याची कार्यवाही केली असून यापुर्वीच सर्व जिल्हा प्रशासनांकडे पुरेसे राष्ट्रध्वज पाठविण्यात आले आहेत. पण ध्वज फडकवायचा कसा? किती वाजता फडकवायचा? उंची किती ठेवायची? या कार्यपद्धतीसह अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या नसल्याने खुद्द अधिका-यांमध्ये स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी ध्वजारोहणाचे दिशा निर्देश स्पष्ट करण्यासाठी अधिकारी वर्ग शासनाच्या पुढील आदेशाची वाट पाहत आहेत.

रोजगार हमी योजनेच्या मजुरांना आपल्या घरावर ध्वज फडकावणे अनिवार्य करण्यात आले आहे. रोहयो मजुरांनी न चुकता आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्ती दाखवावी, असे आदेश ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने दिले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ध्वज कसा फडकवावा, याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. 13 ते 17 तारखेपर्यंत तिरंगा झेंडा फडकवावा, असे आवाहन करत शासनाचे एक पथक मोहीम राबवत आहे. या पथकाला राष्ट्रध्वज फडकविण्याच्या पद्धतीबाबत लोक प्रश्न विचारत असून त्यांच्याकडून नागरिकांना गोंधळाची उत्तरे ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार असल्याने ध्वजसंहिता आणखी सोपी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, अनवधानाने राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी जनतेने पाळावयाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट दिशा दिल्यास हा कार्यक्रम अधिक नीटपणे पार पाडता येणार आहे.

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी..
जनतेच्या घरावर कोणत्याही पक्षाचा, धर्माचा, जातीचा, संघटनेचा झेंडा फडकणार नाही याची काळजी घेणे. ध्वजारोहणाच्या वेळी शिस्त राखण्यासाठी स्काऊट आणि गाईड्स, एनसीसी आणि एनएसएस च्या माध्यमातून जनजागृती करणे. ध्वजारोहण कौशल्याबद्दल शिक्षक – विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सामूहिक प्रशिक्षण देणे. विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांकडून प्रचार करणे.

सरकारने बेळगाव जिल्ह्याला 30 हजार राष्ट्रध्वजांचा पुरवठा केला आहे. 25 रु.ला एक प्रमाणे ध्वज वितरित केले जात आहेत. सध्या जनतेने आपल्या घरावर झेंडा फडकवावा, असा प्रचार केला जात आहे. कोणत्या आकाराचे झेंडे फडकवायचे?, कसे फडकवायचे, वेळ काय, यासंदर्भात अद्याप शासनाचे निर्देश आलेले नाहीत.
– डॉ. नितेश पाटील, जिल्हाधिकारी

SCROLL FOR NEXT