बेळगाव

बेळगाव : सीमाभागातील शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी

मोहन कारंडे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सीमाभागातील शिवसेनेचे शिष्टमंडळ शनिवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी येथील रामलिंगखिंड गल्लीतील मध्यवर्ती शिवसेनच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी शिवसेना बंडखोरांचा निषेध करुन उध्दव ठाकरे यांना एकमुखी पाठिंबा दर्शवण्यात आला. यानंतर त्यांची घेण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ रवाना झाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या एका गटाने बंड केल्याचे पडसाद सीमाभागात उमटले. त्यानंतर शनिवारी दुपारी मध्यवर्ती शिवसेनेच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी सीमाभागातील शिवसैनिक ठाम असल्याची माहिती शिरोळकर यांनी दिली.

शिरोळकर म्हणाले, शिवसेनेला संघर्ष हा नवीन नाही. यापूर्वीही असे अनेक धक्के शिवसेनेने सहन केले आहेत. शिवसेना कधीही डगमगली नाही. उध्दव ठाकरे यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. आता आम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही मोजक्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन आम्ही रवाना होत आहोत. यावेळी आम्ही संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेते आणि पदाधिकार्‍यांची भेटी घेणार आहोत.

मराठीतून कागदपत्रे मिळावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. यामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही शिरोळकर यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरले, शहराध्यक्ष दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, महेश टंकसाळी, विजय सावंत, दत्ता पाटील, रमेश मालवी, विनय कोलकार, पांडुरंग हण्णूरकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT