बेळगाव

बेळगाव : सिक्स घेतली ‘किक’ने आत, फलंदाजाचा घात…

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री चषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात साईराज वॉरिअर्सचा क्षेत्ररक्षक किरण तरळेकर याने घेतलेल्या अफलातून झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जीमी निशाम, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी ट्विटरवर या झेलचा व्हिडीओ शेअर करून कौतुक केले आहे.

श्री चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी दुसर्‍या उपांत्य सामन्यात हा क्षेत्ररक्षणाचा आविष्कार पाहावयास मिळाला. या झेलची दखल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी घेताना झेलचा व्हिडीओ शेअर करून ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. सीमारेषेवर झेल घेणारी व्यक्ती फुटबॉल खेळणारी असेल, तरच असे अफलातून झेल पाहायला मिळतात, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे. याशिवाय न्यूझीलंडचा खेळाडू जिमी निशाम यानेही 'खरोखर उत्कृष्ट झेल' अशी दाद दिली आहे. मायकल वॉन याने 'सर्वकालीन उत्कृष्ट झेल' अशी टिप्पणी केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना एसआरएस हिंदुस्थान संघाच्या नरेंद्र मांगुरे याने जावेदने टाकलेला एक चेंडू मैदानाबाहेर टोलविण्याचा प्रयत्न केला. काही क्षण हा चेंडू सीमापार गेला, असेच वाटत होते; पण सीमारेषेवर उभा असलेला क्षेत्ररक्षक किरण तरळेकर याने कमाल केली. त्याने उंच उडी मारून झेल पकडला; पण त्याचा तोल सीमारेषेबाहेर गेला. याचवेळी त्याने चेंडू मैदानाच्या आतील बाजूला फेकला; पण चेंडू मैदानाबाहेर असल्याने तो आत घेण्यासाठी फुटबॉलला कीक दिल्याप्रमाणे त्याने उजव्या पायाने चेंडू मैदानात भिरकावला. यावेळी जवळ असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. पंचांच्या निर्णयानुसार फलंदाज बाद होऊन माघारी परतला; मात्र या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. फलंदाज नियमानुसार नाबाद होता. कारण, क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर पायाने चेंडू वर उडविताना दुसरा पाय जमिनीला स्पर्श करतोय, असे व्हिडीओत दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT