बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन महिन्यांचा कालावधी असला तरी राजकीय पक्षांनी तयारी जोमाने सुरू केली आहे. काँग्रेसने बुधवारी आपल्या प्रजा ध्वनी यात्रा अर्थात जनतेचा आवाज यात्रेची सुरुवात बेळगावातून करत सत्तेवर आल्यास सगळ्याच कुटुंबांनी महिन्याला 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर 40 टक्के कमिशनचे सरकार असलेल्या भाजपला सत्तेवरून बाजूला करा, असे आवाहन केले.
कर्नाटकातील भाजप सरकार भ्रष्टाचार जनताविरोधी आहे. चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत आहे. महागाईच्या झळा सोसणार्या जनतेला दिलासा देण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे. सत्तेवर आल्यास शेतकर्यांना कर्जमाफी, महागाईवर नियंत्रण अशा घोषणाही काँग्रेसने केल्या. ऑटोनगर येथील अंजुमन शाळेच्या मैदानावर काँग्रेस 'प्रजाध्वनी यात्रे'चे उद्घाटन झाले. त्यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, प्रजा ध्वनी हा राज्यातील सामान्य जनतेचा हा आवाज आहे. या आवाजाच्या माध्यमातून भ्रष्ट सरकारचे उच्चाटन केेले पाहिजे. बेळगावसारख्या ऐतिहासिक शहरातून सुरू करण्यात आलेल्या प्रजा ध्वनी यात्रेला जनतेचा लाभलेला प्रतिसाद सार्थकी ठरेल. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारला योग्य धडा शिकविण्याची हीच वेळ आहे. 40 टक्के कमिशन मागणार्या मंत्र्यांच्या जाचाला कंटाळून अनेक कंत्राटदारांनी आत्महत्या केली. जबाबदार मंत्र्यांनी हे कृत्य केले असले तरी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांना पाठीशी घालतात. अशा सरकारचे उच्चाटन करावेच लागेल.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राज्यातील सरकार अलीबाबा आणि चाळीस चोरांचे आहे. 40 टक्कं कमिशनचे सरकार आहे. कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राज्यातील सरकारकडून मागितल्या जाणार्या कमिशनची तक्रार गेली आहे. दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी साधी चौकशी करण्यात आलेली नाही. पंतप्रधान या विषयावर गप्प का? राज्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली, याचा हिशेब भाजपने द्यावा. केंद्र सरकारकडून निधी आणण्याची धमक कर्नाटक सरकाकडे नाही. त्यामुळेच कोरोना काळात निराधार झालेल्या कुटुंबीयांना अद्यापही सरकारच्या योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. गरिबांसाठी उघडण्यात आलेल्या इंदिरा कँटीला अनुदान देण्यात आले नसल्याने घरघर लागली आहे. केवळ भ्रष्टाचारात अडकलेल्या सरकारला जनतेच्या कल्याणाची काळजी नाही. अशा सरकारचे उच्चाटन करणेच योग्य.
व्यासपीठावर राज्याचे काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, आ. डॉ. अंजली निंबाळकर, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. चन्नराज हट्टीहोळी, आ.महांतेश कौजलगी, माजी आ. फिरोज सेठ, बी.के हरिप्रसाद, एम.बी पाटील, अशोक पट्टण, शहरध्यक्ष राजू सेठ, ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी, आदी उपस्थित होते.