कुर्ली; पुढारी वृत्तसेवा : आप्पाचीवाडी गाव हे हालसिद्धनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून, नाथांच्या कृपेने व येथील नागरिकांच्या सहकार्याने आप्पाचीवाडी गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे राबविण्यात आली असून मतदारसंघाचा शैक्षणिक क्षेत्रातही हायटेक विकास साधणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. आप्पाचीवाडी येथे 1 कोटी 39 लाखांच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या, गावाच्या विकासासाठी आपण येथील दलित वस्तीतील आंबेडकर भवन नवीन बांधण्यासाठी 12 लाख रुपये निधी, प्राथमिक शाळेतील दोन खोल्या बांधण्यासाठी 44 लाख, हालसिद्धनाथ देवस्थानच्या यात्रेकरूंची सोय होण्यासाठी यात्रीनिवासाला 25 लाख, आप्पाचीवाडी येथील हायस्कूल इमारत बांधण्यासाठी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याचे लोकार्पण होत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनी हालसिद्धनाथ मंदिर जीर्णोद्धार कामासाठी 30 लाख रुपयांच्या निधी मंजुरीचे पत्र, विधवा व वृद्ध नागरिकांना पेन्शन मंजुरी पत्र, कोरोनाकाळात मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये सहाय्यनिधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास हालशुगरचे संचालक राजाराम खोत, रामचंद्र शिंदे, पवन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, एसडीएमसी पदाधिकारी उपस्थित होते.