बेळगाव

बेळगाव : विद्यार्थ्यांना पुन्हा आले युक्रेनमधून बोलावणे!

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  रशिया-युक्रेनमधील युध्द अजून संपले नसले तरी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा बोलावणे आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 28 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

भारतातील वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षण महागडे असल्यामुळे व गुणवत्ता यादी अधिक असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेणे पसंत केले होते. स्थानिक परिसरात वैद्यकीय शिक्षणासाठी जवळपास एक कोटी रुपये डोनेशनची मागणी होत होती. यामुळे युक्रेनमधून अठरा लाखांमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण होणार असल्याने गतवर्षी बेळगाव जिल्ह्यातील 28 विद्यार्थ्यांनी युक्रेन देशातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

सहा महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली.या विद्यार्थ्याना जीव वाचवून भारतात यावे लागले. त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खूप मेहनत घेतली. बेळगाव जिल्ह्यातील 28 विद्यार्थी मार्च महिन्यात परतले होते. त्यांचे शिक्षण अधांतरीच राहिले. मे महिन्यामध्ये परत आलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. ऑनलाईन परीक्षाही घेण्यात आली.

अजुन युध्द सुरु असले तरी युध्दाची तीव्रता कमी झाली आहे. यामुळे युक्रेनच्या शिक्षण खात्याकडून डिसेंबरमध्ये द्वितीय वर्षाच्या शिक्षणासाठी डिसेंबरमध्ये येण्याचे निमंत्रण विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे आले आहे. विद्यार्थ्यांंनी प्रथम वर्षासाठी चार लाख रुपये भरुन प्रवेश घेतला असून, द्वितीय वर्षासाठी तितकेच शुल्क भरुन प्रवेश घ्यावा लागणार आहे. युक्रेनेमधून परतलेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांनी आता वेगळे क्षेत्र निवडले असून, काहीजणांंनी येथेच पुन्हा 'नीट' दिली आहे. यामुळे यातील किती विद्यार्थी पुन्हा युक्रेनला परत जातील हे सांगणे कठीण आहे.

युक्रेनमधून मला बोलावणे आले आहे. मी सध्या याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहे. मी पुन्हा परत जाण्याची शक्यता कमी आहे. मी प्रथम वर्ष उत्तीर्ण झाली आहे. परंतु, पुन्हा एकदा पहिल्या वर्षापासून भारतात शिक्षण घ्यावे लागणार आहे.
– एक विद्यार्थिनी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT