बेळगाव

बेळगाव : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सुमारे 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या तुलनेत बससेवा कमी असल्याने विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातून मोजक्याच बस ठरावीक वेळेत धावत असल्याने त्यातून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत चाललेली दिसते. त्यासाठी परिवहन महामंडळाने बसची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

बसपास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे. सर्व्हरडाऊन, तांत्रिक समस्येमुळे वितरण प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. यंदा जूनपासून बसपास वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला असून आतापर्यंत बीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी बसपास दिला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रथम सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने बसपास उपलब्ध होण्यास उशीर होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक वर्षदेखील विस्कळीत झाले होते. त्यामुळे बसपास काढणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

यंदा 70 हजारपैकी 20 हजार विद्यार्थ्यांनी अजून बसपास मिळविलेले नाहीत. सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक समस्येमुळे बसपास प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अपुर्‍या बससेवेमुळे विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी सायकल अथवा दुचाकीचा वापर करतात. शाळेच्या वेळेत पोहचण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. त्या गडबडीत अवजड वाहनाच्या धडकेत चार दिवसांत दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे.

स्कूल बस कागदावरच
शाळांतील मुलांची पटसंख्या वाढावी म्हणून शाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्कूल बस योजना राबवण्यात येणार आहे. ही बस आमदार फंडातून खरेदी करायची आहे. मात्र, ही योजना कागदावरच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT