बेळगाव : पुढारी वृत्तसेवा विजेचे खासगीकरण थांबवा, शेतीमालाला हमी भाव द्या, अशा मागण्या करत शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. त्याआधी काही वेळ चन्नम्मा चौकात रास्ता रोकोही करण्यात आला. त्यामुळे रहदारीची कोंडी झाली होती. मोर्चा आरटीओ सर्कलपासून चन्नम्मा चौक त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
राज्य सरकारने केलेले तीन कृषी कायदे तत्काळ मागे घ्यावेत, वीज खासगीकरण कायदा व कृषी पंपांना मीटर बसवणे बंद
करावे, वनजमिनी कसणार्या पात्र शेतकर्यांना हक्कपत्र देण्यात यावे, शेतीमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा, गायरान जमिनी व्यापारी संस्थांना देणे बंद करावे, ऊसाला राज्यभरात समान भाव देण्यात यावा, राज्यात 2010 ते 2018 पर्यंत दुष्काळ आणि त्यानंतर अतिवृष्टी झाली.
त्यामुळे शेतकर्यांना ट्रॅक्टर कर्ज, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज आणि सहकारी संस्थांचे भूविकास कर्ज, हरितगृह कर्ज (पॉलीहाऊस) माफ करावे, एपीएमसीमध्ये शेती माल खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, अपूर्ण जलसिंचन योजना पूर्ण करण्यात यावी, शेतकर्यांसाठी ग्राम पंचायतीमध्ये वैज्ञानिक सल्ला केंद्र शेतकर्यांसाठी सुरु करण्यात यावे.
आंदोलनामध्ये रवी पाटील, चन्नाप्पा गणाचारी, प्रसाद कुलकर्णी, कल्लाप्पा हरीयाल, महिला तालुका अध्यक्षा भाग्यश्री कुंभार, मल्लिकार्जुन जुटण्णावर आदी सहभागी झाले होते.