बेळगाव

बेळगाव : लहान भावाकडून मोठ्याचा खून

दिनेश चोरगे

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा :  सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी चिकोडी शहराबाहेरील उमराणी घाटानजीक घडली. अकबर शेख (वय 40) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून अमजद शेख (वय 38) असे संशयिताचे नाव आहे. संशयित चिकोडी पोलिसांना शरण आला आहे.

याबद्दल चिकोडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अकबर याचे कब्बूर येथे बॅटरीचे दुकान असून शनिवारी दुपारी 4 च्या दरम्यान तो कब्बूरहून चिकोडीकडे आपल्या दुचाकीने जात होता. यावेळी लहान भाऊ अमजदने त्याचा कारने पाठलाग करून वाटेत अडवले व धारदार शस्त्राने अकबरवर हल्ला करून खून केला. त्यानंतर अमजद थेट चिकोडी पोलिस स्थानकात हजर झाला. या घटनेमुळे चिकोडी शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी चिकोडी सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय यमनाप्पा मांग घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. कोणत्या कारणातून हा खून झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत संशयिताकडे चौकशी सुरू होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चिकोडी सरकारी इस्पितळात पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर इस्पितळ व चिकोडी पोलिस स्थानकाबाहेर मोठी गर्दी झाली होती.

SCROLL FOR NEXT