बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पीस्किनचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये तीन जनावरांचा बळी गेल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शेतकर्यांमध्ये जागृती अभियान हाती घेण्यात आले असून लसीकरण अभियानही सुरू करण्यात आले आहे. गावागावांतून खबरदारी घेण्याबाबत दवंडी देण्यात येत असून रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
बेळगाव शहराला लागूनच असणार्या बसवण कुडची येथील तीन जनावरांचा लम्पीस्किनमुळे मृत्यू झाला आहे. हा त्वचारोग असून यावर अद्याप खात्रीशीर इलाज उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे पशू संगोपन आणि वैद्यकीय खात्यातर्फे जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
पशू संगोपन खात्याने जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक ग्राम पंचायतीला नोटीस बजावली आहे. गावातील जनावरे चारण्यासाठी बाहेर सोडण्यात येऊ नयेत. बाहेरची जनावरे गावात घेऊ नका. नवीन जनावरांची खरेदी करू नका. रोगाची लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास तातडीने पशू वैद्यकीय खात्याला याबाबत माहिती द्या. रोगाची लागण टाळण्यासाठी लसीकरण करून घ्या, आदी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे. शेतकर्यांमध्ये जागृती केली.
हा आजार एका विषाणूमुळे गुरांमध्ये परसतो. ज्याला लम्पी स्किन डिसीज व्हायरस म्हणतात. त्याच्या तीन प्रजाती आहेत. ज्यामध्ये ही पहिली प्रजाती आहे. त्यानंतर गोटपॉक्स व्हायरस आणि मेंढीपॉक्स व्हायरस अशा आणखी दोन प्रजाती आहेत.
लम्पीस्किन रोगाची लक्षणे
या आजाराची अनेक लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये ताप, वजन कमी होणे, लाळ वाहणे, डोळे व नाकातून पाणी येणे, कमी दूध येणे, शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दिसतात. यासोबतच या आजारात शरीरात गाठीही तयार होतात. सोबतच यामुळे मादी गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, पांगळेपणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही दिसून आले आहे.
हा एक प्रकारचा विषाणू आहे ज्यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. डास आणि माश्या यांसारख्या रक्त शोषणार्या कीटकांमुळे आजार पसरतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दूषित पाणी आणि चार्यामुळे संसर्ग जनावरांना होतो. कोणत्याही प्राण्यामध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला इतर गाई व म्हशींपासून वेगळे करावे. त्यांचे पाणी किंवा चारा इतर कोणत्याही प्राण्याला देऊ नका. तसेच ज्या ठिकाणी लागण झालेला प्राणी ठेवला आहे त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.