बेळगाव

बेळगाव : यरगट्टीजवळ ट्रकची कार, दुचाकीला धडक; तिहेरी अपघातात चौघे ठार

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :   भरधाव ट्रकची कारला व एका दुचाकीला धडक बसली. यामध्ये कारमधील पाच जणांपैकी माय-लेक व चालक तर दुचाकीवरील तिघांपैकी वृद्ध महिला जागीच ठार झाली. सौंदत्ती यल्लम्मा दर्शनाला जाताना बेळगाव-बागलकोट रस्त्यावरील यरगट्टीजवळील बुदीगोप्प गावाजवळ रविवारी 12.45 वा. हा अपघात घडला. कारमधील अन्य दोघे व दुचाकीवरील दोघे असे चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये कारमधील रूक्मिणी यल्लाप्पा हलकी (वय 39), त्यांची मोठी मुलगी अक्षता यल्लाप्पा हलकी (वय 21, दोघीही मूळ रा. ओबलदिन्नी, ता. सौंदत्ती, सध्या रा. बेळगाव), कारचालक निखिल अरुण कदम (वय 24, रा. कंग्राळी, ता. बेळगाव) व दुचाकीवरील वृद्धा हनमव्वा बसाप्पा चिप्पलकट्टी (वय 65, रा. बागोजीकोप्प, ता. रामदूर्ग) यांचा समावेश आहे.

यल्लाप्पा मल्लाप्पा हलकी हे सहाय्यक उपनिरीक्षक असून ते सध्या रायबाग तालुक्यातील कुडची येथे कार्यरत आहेत. ते मूळचे जरी सौंदत्ती तालुक्यातील ओबलदिन्नी येथील असले, तरी मुलांच्या शाळेच्या निमित्ताने बेळगावात राहतात. रविवारी मुलांना सुटी असल्याने त्यांची पत्नी रुक्मिणी, मोठी मुलगी अक्षता, लहान मुलगी पूजा (वय 20), मुलगा मुत्तूराज (वय 11) हे चौघेजण कार घेऊन सौंदत्ती यल्लम्मा दर्शनाला निघाले होते. या वाहनावर निखील कदम हा चालक होता. त्यांची कार बुदीगोप्प गावच्या हद्दीत आली तेव्हा यरगट्टीहून बेळगावकडे ट्रक येत होता. भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून बेळगावहून यरगट्टीकडे निघालेल्या कारला ट्रकची जोरदार धडक बसली. याचवेळी कारच्या पाठीमागे दुचाकी (देखील होती. आधी कारला व नंतर दुचाकीला जोराची धडक बसल्याने कारमधील तिघेजण तर दुचाकीवरील वृद्धा हनमव्वा या जागीच ठार झाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT