बेळगाव

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न निकालात निघेल… हालसिद्धनाथ देवाची भाकणूक

दिनेश चोरगे

जत्राट;  नंदकुमार चेंडके :  मेघाची कावड गैरहंगामी हाय. मेघाच्या पोटी आजार हाय. पीक, पाणी व पावसाचे प्रमाण हळूहळू बदलत जाईल. कोल्हापूरचं घराणं क्षत्रिय वंशाचे हाय. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. हालसिध्दनाथांचा जयजयकार करा. हालसिध्दनाथांनी पूर्वीच्या काळापासून येथे निशाण रोवलं आहे. श्रीपेवाडी ही बसवाण व हालसिध्दनाथांची पवित्र भूमी हाय. येथे हालसिध्दनाथांचा दरबार भरलाय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न निकालात निघेल. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होईल, अशी भाकणूक वाघापूरचे कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली. श्रीपेवाडी येथील हालसिध्दनाथ देवाची भाकणूक कथन करताना ते बोलत होते.

कृष्णात डोणे महाराज म्हणाले, पुजारी आणि मानकर्‍यांना माझा आशीर्वाद हाय. निपाणीच्या सरकार घराण्याला माझा आशीर्वाद हाय. निपाणी सरकार घराण क्षत्रिय वंशाचे हाय. पिवळ्या भस्म्याचा महिमा वाढत चाललाय. गव्हाची पेंढी मध्यम पीकल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. धान्य दारात वैरण कोण्यात ठेवशीला. वैरण सोन्याची होईल. वैरण आणि धान्याच्या चोर्‍या होतील. बकर्‍याचा भाव लाखात वाढत राहील. बकर्‍याची किंमत कोंबड्याला येईल. साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांक गाठेल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर सुखात राहील. दुधाचा भाव गगनाला भिडेल. शेतकरीवर्ग चिंतेत राहील. व्यापारी लोक शेतकर्‍यांची लुबाडणूक करतील.

अठरा तर्‍हेचा मनुष्याला आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. कोरोनाचा आजार कमी-जास्त होईल. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल. पशु-पक्षी आणि मनुष्यात रोगराई येईल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. विज्ञानाची प्रगती मनुष्याला घातक ठरेल. येत्या 100 वर्षात मनुष्य पृथ्वी सोडून परगृहावर जाईल. जगात लोकसंख्या वाढीची स्पर्धा लागेल. अती लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील भार वाढत जाईल. राजकारणात मोठा गोंधळ होईल. सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात लोक उड्या मारतील. सत्तेच्या राजकारणात राजकीय नेता विकत मिळेल. कर्नाटकात मोठा राजकीय पक्ष सत्तेपासून वंचित राहील. महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ होईल. सतेचे सिंहासन ढळमळीत होईल. निपाणी भागाचे भविष्य मोठे हाय. राजकीय प्रस्थापितांना धक्का बसेल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. जगातील अनेक देश एकमेकाविरोधात युध्द करतील.

चीन राष्ट्र जगासाठी घातक ठरेल. भारत-पाकिस्तान यांचे छुपे युध्द होईल. लाचलुचपत, भष्ट्राचाराला देशात उधाण येईल. गॅस, पेट्रोल दरवाढीने जनता हैराण होईल. सामान्य माणसाला जगणे मुश्कील होईल. भारताचा रूपया महाग होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाचे मौल्य वाढत राहील. भारत देश जगात महासत्ता बनेल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. मेघराजा ताळतंत्र सोडेल, अशी भाकणूक डोणे महाराजांनी कथन केली.  यावेळी मानकरी, पुजारी, यात्रा कमिटीचे सदस्य व भाविक उपस्थित होते.

      भाकणुकीतील ठळक मुद्दे

  • कर्नाटकात मोठा राजकीय पक्ष सत्तेपासून वंचित राहील
  •  विज्ञानाची प्रगती मनुष्याला घातक ठरेल
  •  महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ होईल
  •  लाचलुचपत, भष्ट्राचाराला देशात उधाण येईल
  •  भारत देश जगात महासत्ता बनेल
SCROLL FOR NEXT