बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मराठी शाळांमध्ये कन्नड शाळा स्थलांतरित करण्यात येत आहेत. मराठी शाळांत पुरेशा संख्येने विद्यार्थी असून देखील शिक्षक का नियुक्त केले जात नाहीत, असा जाब महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बुधवारी शिक्षणाधिकार्यांना विचारला. मराठी संस्कृती आणि शाळांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गणपत गल्लीतील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे कन्नड शाळेचे वर्ग भरविण्यात येत आहेत. त्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती नेते व कार्यकर्त्यांनी शाळेला भेट दिली.
शहर गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांना भेटून चर्चा करण्यात आली. मराठी शाळेत कन्नड शाळा स्थलांतराच्या कृतीचा निषेध करण्यात आला. मराठी शाळांना सर्व सुविधा पुरवाव्या, शिक्षक भरती करावी आणि मराठी शाळांवरील अतिक्रमण थांबविले जावे, अशी मागणी केली. यावेळी सदर कन्नड शाळा तात्पुरती हलवली असून लवकरच इतरत्र स्थलांतर करू, असे आश्वासन शहर शिक्षणाधिकार्यांनी दिले.
युवा समिती उपाध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रिया कुडची, सुरज कणबरकर, अजित कोकणे, वासू सामजी, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, अतुल केसरकर, माजी विद्यार्थी उपस्थित होते.