उचगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाटा येथे शिनोळीच्या दिशेने जाणार्या स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. एकाच्या पायाला तर दुसर्याच्या डोक्याला मार लागला आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता दुर्घटना घडली.
बेळगुंदी फाट्यानजीक असलेल्या एका कंपनीतील दोन कामगार बेळगाव वेंगुर्ले मार्गाकडे येत होते. फाट्यावर आल्यानंतर चंदगडच्या दिशेने जाणार्या स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिली. यानंतर गणेश दूध संकलन केंद्रातील सुधाकर करटे व प्रवीण देसाई यांनी रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
अपघातस्थळी गतिरोधक घालण्याची मागणी करण्यात येत आहे. येथे खड्डा पडला असून अनेकवेळा अपघात झाले आहेत. गतिरोधक नसल्याने मृत्यूचा सापळाच याठिकाणी बनला आहे. येथे तीन ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी होत आहे.