बेळगाव

बेळगाव : बिबट्याचे बुधवारी मध्यरात्री पुन्हा दर्शन

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  मंगळवारी रात्री निदर्शनास आलेला बिबट्या बुधवारी रात्री पुन्हा अरगन तलाव परिसरात निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. वारंवार याचा परिसरात बिबट्या नागरिकांना निदर्शनास येत असल्याने रात्रीची गस्त वाढविण्याची तयारी वनखात्याने केली आहे.

गोल्फ मैदान परिसरात असणारा बिबट्या वारंवार या भागातील नागरिकांच्या नजरेस पडत आहे. त्यामुळे वनखात्यानेही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवारी रात्री 12 च्या सुमारास बेळगावहून हिंडलग्याकडे जाणार्‍या अजय मास्ती यांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधून जात असताना गोल्फ मैदान जवळील गांधी चौकाजवळ बिबट्या निदर्शनास आला. कारचा आवाज ऐकताच बिबट्या जवळच असणार्‍या संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन पुन्हा गोल्फ मैदान परिसरात गेला असल्याचे अजय मास्ती यांच्याकडून सांगण्यात येत आहे. याची माहिती पोलिसांना समजताच हिंडलगा- बेळगाव रस्त्यावर पुन्हा नाकाबंदी करण्यात आली होती.

प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येणार्‍या माहितीवरुन बिबट्या गोल्फ मैदान परिसरातच ठाण मांडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. अरगन तलाव परिसरात दोन दिवसांपासून बिबट्या निदर्शनास आल्याने वन खात्याने त्या भागातही शोध मोहीम हाती घेतली आहे.

श्‍वानांच्या मोहिमेकडे लक्ष
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी सापळे उभारण्यात आले आहेत. आता मुधोळ हाऊंड श्‍वानांंची मदत घेण्याची तयारी वन खात्याने चालविली आहे. अद्ययावत यंत्रणा उभारुन ही बिबट्या हाती लागत नसल्याने श्‍वानांची मदत घेतली जाणार असल्याचे वन खात्याच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे श्‍वानांच्या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

SCROLL FOR NEXT