बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने सिंगल यूज प्लास्टिकविरोधात मोहीम हाती घेतली होती. पण, कशीबशी महिनाभर मोहीम राबवण्यात आल्यानंतर आता ती बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीनंतर तर एकही दिवस मोहीम राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यात आल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. दुकानदार कापडी पिशव्यांचा आग्रह करत आहेत. तर ग्राहक स्वत:च पिशव्या आणत असल्याचे चित्र आहे. पण, अनेक ठिकाणी अजूनही प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. त्यामुळे ही मोहीम कायम ठेवणे आवश्यक होते. पण, महापालिकेने अचानकपणे ही मोहीम बंद केली आहे.
गेल्या आठवड्यात महापालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी बैठक घेतली. त्यामध्ये प्लास्टिक बंदीबाबत सूचना केल्या. प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेत्यांचेही म्हणणे ऐकले. त्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी मोहीम तीव्र करण्यात येईल, असे सांगितले. दुसरीकडे महापालिकेने कामाचा व्याप वाढला असल्यामुळे प्लास्टिक बंदी मोहीम स्थगित करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
कारभाराबाबत नाराजी
सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहीमेला खीळ बसली आहे. अध्यक्षांच्या बैठकीनंतर एकाही दुकानावर छापा टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.