बेळगाव

बेळगाव : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

दिनेश चोरगे

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  रामदुर्ग तालुक्यातील होसूर येथील खून मृताच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. कटकोळ पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या खुनाचा छडा लावला असून महिलेसह दोघांना अटक केली. पांडाप्पा दुंडाप्पा जटगण्णवर (वय 35, रा. होसूर, ता. रामदूर्ग) याच्या खुनाची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये पांडाप्पाची पत्नी लक्ष्मी जटगण्णवर (वय 30) व तिचा प्रियकर रमेश बडीगेर (36) यांचा समावेश आहे.

होसूर येथील पुलावर सोमवारी घोंगड्यामध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. बाजूलाच दुचाकी देखील पडलेली होती. हा मृतदेह पांडाप्पा जटगण्णवर याचा असल्याचे समजले. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सकाळी पत्नीने आपला पती गायब असल्याचा बनाव सुरू केला. परंतु, घटनास्थळाचे पुरावे पाहून कटकोळ पोलिसांनी पत्नीची उलट तपासणी सुरू केली. यावेळी पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीचा खून केल्याचे कबूल केले.

लक्ष्मीचे गावातीलच रमेश याच्याशी अनैतिक संबंध होते. यातून पती-पत्नीत सातत्याने वाद होत होते. रविवारी रात्रीही या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी लक्ष्मीने फोन करून रमेशला घराकडे बोलावून घेतले. यावेळी पांडाप्पा व रमेशमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी लक्ष्मीने पती पांडाप्पाच्या डोक्यात शेती अवजाराने हल्ला केला. यामध्ये पांडाप्पा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी दोघांनी त्याचा मृतदेह एका रगमध्ये गुंडाळून दुचाकीवरून नेऊन तो होसूर येथील पुलाजवळ टाकला. दुचाकीही त्याच्याच बाजूला टाकली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुढील तपास सुरू झाला व महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT