बेळगाव : विजापूर येथून नोकरी आणि प्रशिक्षणासाठी बेळगावात आलेल्या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नेहरूनगर येथील एका खासगी वसतिगृहात (पीजी) उघडकीस आली. ऐश्वर्यलक्ष्मी मेलाप्पा गलगली (वय 24, मूळ रा. इब्राहिमपूर, विजापूर, सध्या रा. साई बिल्डिंग पहिला क्रॉस, नेहरूनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी 6 ते 8 या कालावधीत ऐश्वर्यलक्ष्मीने गळफास घेतला. याच काळात या पीजीमध्ये कोणी तरी तरुण आला होता. त्याने दरवाजा तोडून ऐश्वर्याचा मोबाईल नेल्याची माहिती समोर आली आहे. तो तरुण कोण, याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पत्रकारांना दिली. ऐश्वर्यलक्ष्मीने एमबीए पूर्ण केले आहे. त्यानंतर ती जानेवारीमध्ये बेळगावात आली होती. नेहरूनगर येथील पीजी सेंटरमध्ये राहून ती ‘एकस’मध्ये इंटर्नशीप करत होती. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे काम संपवून पीजीला आली. येथील काही मैत्रिणींशी चर्चा करून नंतर ती त्याच्या खोलीवर गेली. यानंतर तिने राहत्या खोलीत आतून कडी लावून साडीने पंख्याला गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मैत्रिणीनीही घटना पाहून पीजी रूम मालकाला याची माहिती दिली.
ऐश्वर्यलक्ष्मीने आत्महत्या का केली, याचे गूढ कायम आहे. परंतु, तिच्या खोलीत रात्रीच्यावेळी कोणी तरी तरुण गेला होता. तरुणीने आतून कडी लावून गळफास घेतला होता. परंतु, संबंधीत तरुणाने दरवाजाचा कोयंडा तोडत प्रवेश केला. त्याने जाताना तरुणीचा मोबाईल नेल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे ऐश्वर्यलक्ष्मीच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. दरम्यान आपल्या मुलीचा मृत्यू संशयास्पद असून त्या तरुणाचा शोध घ्यावा, अशी मागणी तरुणीची आई पार्वती मेलाप्पा गलगली यांनी केली आहे. तशी फिर्याद त्यांनी एपीएमसी पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले की, तरुणीच्या खोलीत घुसून मोबाईल नेणारा तो तरुण कोण आहे, याचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून मृत तरुणीच्या काही मैत्रिणींकडेही चौकशी केली आहे. शिवाय वसतिगृह मालकाकडूनही माहिती घेतली आहे. त्यामुळे सदर तरुणाला लवकरच जेरबंद केले जाईल. त्यानंतर तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.