बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव-बागलकोट रोडवरील शिंदोळी क्रॉस कुबेर धाब्याजवळ दुचाकीला परिवहन मंडळाच्या बसने मागून धडक दिली तरी, दोघेजण बालंबाल बचावल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. केवळ दैवबलवत्तर म्हणून सदर दोघेजण बचावले आहेत. या घटनेत सुभाष बेडका (वय 40), सुधीर बेडका (वय 26, दोघेही रा. शिवाजी गल्ली बसवणकुडची), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
बेळगावहून जमखंडीला जाणार्या परिवहन मंडळाच्या बसने ही धडक दिली आहे. सुधीर व सुभाष हे दोघेजण चुलत भाऊ असून एकाच दुचाकीवरुन कुडचीकडून निलजीकडे जात असताना शिंदोळी क्रॉसवरील कुबेर धाब्याकडे अचानक दुचाकी वळवली. इतक्यात बेळगावकडून जमखंडीला जाणार्या परिवहन मंडळाच्या बसने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी बस पुढे नेली. इतक्यात सदर दुचाकीस्वार समोर आल्याने बसची मागून धडक बसली. यामध्ये दोघेजण दुचाकीसह रस्त्याकडेला फेकले गेले. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बसचालकाच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली आहे.