बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : रेसकोर्सजवळ गोल्फ क्लब परिसरात रविवारी बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानुसार वन खात्याच्या कर्मचार्यांनी या भागात सापळा रचला आहे. रेसकोर्समध्ये पाच ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न गदगच्या पथकाकडून तिसर्या दिवशीही सुरू आहे. बिबट्याला पकडण्यासाठी यापूर्वी सात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. 12 ट्रॅप कॅमेर्याद्वारे बिबट्याची छबी कैद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दोन दिवसांपूर्वी जाधवनगरमध्ये बिबट्याने बांधकाम मजुरावर हल्ला केला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण केले होते. ही माहिती मिळताच पोलिस कर्मचारी, वनखाते व अग्निशामक दलाचे जवान बिबट्याचा शोध घेत आहेत. शनिवारी रात्री जाधवनगर, हनुमानगर, सदाशिवनगर, अशोकनगर या भागात रात्री बिबट्याचा शोध घेण्यात आला.
बिबट्याला पकडण्यासाठी गदग जिल्ह्यातून तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले होते. बिबट्याचा शोध तिसर्या दिवशीही सुरु होता. या ठिकाणी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्यात अजून बिबट्यासदृश्य प्राणी दिसला नसल्याची माहिती वनखात्याने दिली. जाधवनगरानंतर बिबट्याने आपला मोर्चा रेसकोर्सकडे वळविल्याची चर्चा आहे. 2019 मध्येदेखील बिबट्या असल्याची अफवा पसरली होती. मात्र, त्यानंतर ते रानमांजर असल्याचे उघडकीस आले होते.