बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. नवी तारीख निश्चित झालेली नाही. ही निवडणूक कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे.
आधीच्या वेळापत्रकानुसर 30 एप्रिलरोजी निवडणुका होणार होत्या. त्यानुसार शुक्रवारी 17 रोजी अर्ज वितरणास प्रारंभ होणार होता. काही इच्छुकांनी अर्ज घेण्यासाठी कार्यालयात चौकशी केल्यानंतर निवडणूक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले.
बेळगावात मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा मे महिन्यात विधानसभा निवडणूकीची धामधूम असल्याने 30 एप्रिलरोजी होणार्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर घ्याव्यात, असा प्रस्ताव खा. इराण्णा कडाडी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत मांडला होता. तो पुणे येथील सदर्न कमांड कार्यालयात पाठवण्यात आला होता. मतदारयाद्या बनवण्यापासून वॉर्डनिहाय नवीन मतदारयादी देखील प्रसिद्ध केली होती. इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी देखील केली होती. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत चार वर्षांपूर्वी संपली आहे.
संरक्षण खात्याने लोकनियुक्त सभागृहाला दोन वर्षांची मुदतवाढ देऊनही दोन वर्षे झाली. त्यामुळे तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका 7 वॉर्डपैकी दोन महिलांकरिता व एक मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला होता.