बेळगाव

बेळगाव : काळादिन फेरीतून अस्मिता दाखवा

दिनेश चोरगे

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  भाषावार प्रांतरचना करताना मराठी बहुभाषिक असणारा सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय झाला असून हा भाग त्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी आणि त्यातून लोकेच्छा प्रकट करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा. सायकल फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले. मराठा मंदिर येथे रविवारी तालुका म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते.

बैठकीला सरचिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बुधवारपासून तालुक्यात जागृती बैठका आयोजित करणे तसेच प्रत्येक गावातील प्रतिनिधींना घेऊन शंभर लोकांची कार्यकारिणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

किणेकर म्हणाले, काळादिन फेरीतून मराठी भाषिकांनी आपली महाराष्ट्रात जाण्याची लोकेच्छा प्रकट करावी. यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यासाठी तालुक्यात बुधवारपासून गावनिहाय जागृती बैठका घेण्यात येतील. समिती बळकट करण्याची जबाबदारी युवकांची आहे. यासाठी कार्यकारिणीची पुनर्ररचना करण्यात येेत आहे. यासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांची नावे समितीकडे देण्यात यावीत. लढ्यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कामगार या सर्वाना सहभागी करुन घ्यायचे आहे. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावात येण्यासाठी पोलिसांनी रोखल्यास त्याचठिकाणी धरणे आंदोलन करण्यात यावे, हा तुमचा हक्क आहे.

माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, सीमालढ्याबरोबर म. ए. समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात महिलांनाही सहभागी करुन घेण्यात यावे. यासाठी त्यांनाही निमंत्रित करावे.

माजी ता. पं. सदस्य लक्ष्मण होनगेकर, शिवाजी सुंठकर, मनोेज पावशे, संतोष मंडलिक, अ‍ॅड. एम. जी. पाटील आदींनी मार्गदर्शन केले.

मध्यवर्ती समितीची उद्या बैठक

मध्यवर्ती म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.11 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवा

आगामी काळात तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये तालुका म. ए. समितीने पूर्ण ताकदीनिशी उतरावे. बूथनिहाय समिती स्थापना करून निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवावा, असा सूर बैठकीत उमटला.

SCROLL FOR NEXT