पुढारी वृत्तसेवा; शिवाजी शिंदे : गाव भेंडिगेरी. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कन्नड भाषिक गाव. त्या ठिकाणी काही मराठा समाजबांधव आहेत. तेथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह समाजकल्याण खात्याच्या अधिकार्यांनी रोखला. त्यामुळे संतप्त बनलेल्या काहीजणांनी संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याची विटंबना केली. त्यानंतर हे कृत्य मराठी भाषिक मराठा समाजातील युवकांनी कृत्य केल्याची तक्रार पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली. या प्रकरणी मराठी भाषिक युवकांना ताब्यात घेण्यात आले.
गाव कुरबरहट्टी. मराठी आणि कन्नड भाषिकांची या ठिकाणी वस्ती आहे. एका वरातीतील मद्यधुंद युवकांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने हुक्के लावले. यामुळे संतप्त झालेल्या मराठी युवकांनी त्या ठिकाणी आक्षेप घेत, पुढे जाण्यास सुनावले. यामुळे कन्नड भाषिकांकडून मराठी युवकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठ युवकांना ताब्यात घेऊन कारागृहात दाखल करण्यात आले.
या दोन घटना अलिकडच्या पंधरा दिवसांतील. येनकेनप्रकारे सीमाभागातील मराठी भाषिक युवकांना टार्गेट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार कन्नड संघटनांनी प्रशासनाच्या सहकार्यातून राजरोसपणे सुरू केला आहे. प्रत्येक वादाला भाषिक वादाचा रंग देऊन सीमाभागात कन्नड धोक्यात असल्याची आवई उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मराठी युवक भरडला जात आहे. त्यांचे आयुष्य अंध:कारमय बनत आहे.
प्रत्येक घटनेमध्ये मराठी युवकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप धुमसत आहे. अधिकार आणि बळाचा वापर करत मराठी चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव खेळण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून यामध्ये वाढ झाली आहे.
यापूर्वी सीमाभागातून म. ए. समितीचे लोकप्रतिनिधी निवडून येत असत. त्यामुळे मराठी भाषिकांवरील अत्याचाराला ताबडतोड वाचा फोडण्यात येत असे. परंतु अलिकडे राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागलेल्या काही मराठी भाषिकांमुळे कन्नड भाषिकांचे फावले आहे. मराठी भाषिकांना रोखण्यासाठी मराठी भाषिकांना लक्ष्य करण्यात
येत आहे.