बेळगाव

बेळगाव : काकतीजवळ महामार्ग बनला जीवघेणा

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय महामार्गावर काकती येथे दोन्ही बाजूला थांबणारी अवजड वाहने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत. चारपदरी असणारा हा महामार्ग काकतीजवळ मात्र दुपदरी होत असल्याने जीवघेणे अपघात घडू शकतात. पोलिसांकडून याबाबत जुजबी कारवाई होते. मात्र, यावर कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना महामार्गालगत अनेक गावे लागतात. ज्याठिकाणी ओव्हरब्रिज नाही अशा लहान गावांमधून कार, दुचाकी तसेच पादचारी रस्ता ओलांडताना दिसतात. काही ठिकाणी पर्यायी रस्ता तयार असला तरी जवळचा मार्ग म्हणून पादचारी मुख्य रस्त्यावरून ये-जा करतात. पादचार्‍यांसाठी हे धोकादायक आहे हे माहिती असूनही ते महामार्गाचाच अवलंब करतात.

महामार्गालगत काही ठिकाणी ढाबे, हॉटेल्स्, टायर रिमोल्डिंग, हवा भरणे यासह अन्य दुकाने आहेत. विशेषत: काकती येथे अशी अनेक दुकाने असल्याने ट्रक चालकांचा डेरा रात्री अन् दिवसाही येथेच पडलेला दिसून येतो. होनगा क्रॉसपासून काही अंतरावर तसेच काकती पोलिस ठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंनी ट्रक, टेंपो, ट्रॅक्टर यासह अन्य अवजड वाहने थांबलेली असतात. याच्याच बाजूला पुन्हा वडाप वाहने, बसेस थांबतात. एका बाजूच्या दुपदरी रस्त्याचा एक भाग या अवजड वाहनांनी व्यापलेला असतो. तर अन्य येणारी वाहने या अवजड वाहनांच्या बाजूलाच थांबतात. त्यामुळे पाठिमागून भरधाव येणार्‍या वाहनचालकांना अडथळे निर्माण होतात.

भरधाव वाहनांना धोका
येथे थांबलेली अवजड वाहने सुमारे अर्धा ते दोन तासांपयर्र्त थांबतात. एखादा ट्रक अचानक निघून जात असल्यास तो वळताना इंडिकेटर न लावल्याने भरधाव येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची धडक होऊन भीषण अपघात होऊ शकतो. परंतु, याच्याशी काहीही देणे-घेणे नसलेले ट्रकचालक बिनदिक्कतपणे येथे वाहन थांबवताना दिसतात.

काकती पोलिसांचे दुर्लक्ष
महामार्गावर एखादा अपघात घडल्यानंतरच येथे दाखल होणारे पोलिस दोन्ही बाजूंनी थांबणार्‍या ट्रककडे मात्र काणाडोळा करतात. येथे ट्रक थांबवू नये यासाठी नियमित पोलिस गस्त असण्याची गरज आहे. परंतु काकती अधिकार्‍यांकडून याची अंमलबजावणी होत नाही. एखादा अपघात घडला की चार दिवस येथे थांबण्याचे नाटक पोलिसांकडून केले जाते. त्यानंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या…' असा प्रकार सुरू असल्यानेच अवजड वाहनधारकांचे फावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT