बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी फौजफाटा लावून येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटवला. त्याला विरोध करणार्या मराठी जनतेवर अमानुष हल्ला केला. त्यानंतर लोकांवरच विविध गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात बुधवारी (दि. 17) तीन साक्षी झाल्या. पण, पोलिसांच्या साक्षीदारांना संशयितांना ओळखता आले नाही. तर सुनावणीला वारंवार गैरहजर राहणार्या आठजणांविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले. पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.
द्वितीय जेएमएफसी न्यायालयात तीन गुन्ह्यांची सुनावणी झाली. गुन्हा क्र. 122/15 मध्ये 47 संशयित असून त्यामधील तिघे अनुपस्थित होते. त्यामुळे संशयित मनोहर भै. कुंडेकर, नारायण बा. कंग्राळकर आणि अनंत वि. पाटील यांच्याविरोधात तर 166/15 गुन्ह्यात 30 पैकी पाच जण सुधीर प. धामणेकर, हणमंत फ. धामणेकर, प्रशांत शं. टक्केकर, मनोहर य. मजुकर, सूरज य. घाडी अशा एकूण आठजणांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले. याशिवाय त्यांच्या जामीनदारांना पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
गुन्हा क्र. 174/15 मध्ये 10 संशयित आहेत. त्यापैकी एकाचे निधन झाले आहे. दिवसभरात पोलिसांच्या वतीने तिघांच्या साक्षी झाल्या. येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील काम पाहात आहे. सुनावणीवेळी अॅड. मारुती कामाण्णाचे यांच्यासह इतर वकील उपस्थित होते. पुढील सुनावणीवेळी सर्व संशयितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
साक्षीदार काय म्हणाले
साक्षीदार चंद्रू सुगंधी, श्रीकांत सुतकट्टी आणि प्रवीण शिंदे या साक्षीदारांनी संशयितांना ओळखले नाही. घटना घडली त्यावेळी मोठा जमाव होता. त्यामध्ये सध्याचे संशयित होते की नाही, हे ओळखता येत नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत पाच साक्षीदार तपासण्यात आले असून, त्यांनी संशयितांना ओळखले नाही.