बेळगाव

बेळगाव : ऊसक्षेत्र वाढल्याने गळीत हंगाम लांबणार

दिनेश चोरगे

बेळगाव; अंजर अथणीकर :  यंदा ऊस क्षेत्र 30 हजार हेक्टरने वाढल्याने गळीत हंगाम लांबणार आहे. चार ते सव्वा चार महिने हंगाम चालण्याची शक्यता असून, येत्या पंधरवड्यात बहुतांशी कारखान्यांची धुराडे पेटणार आहेत. यावर्षी 28 साखर कारखाने गळीत हंगाम घेणार आहेत. पावसाचा जोर ओसरल्यानंतर गळीत हंगामास प्रारंभ होणार असून बहुतांशी कारखाने 15 आक्टोंबरपर्यंत सुरु होणार आहेत. याची कारखान्यांकडून तयारी सुरु आहे.

जिल्ह्यात 3 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध झाल्याने ऊसतोड कामगारांचीही यंदा समस्या जाणवणार नाही. जिल्ह्यामध्ये गतवर्षी 27 पैकी 26 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. यावर्षी अथणी तालुक्यात नव्याने कारखाना सुरु होत असल्यामुळे 28 साखर कारखान्यांची धुरांडी पेटणार आहेत. काही कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन समारंभही झाले आहेत. 1 नोव्हेंबरपर्यंत सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. यावर्षी ऊस क्षेत्र वाढल्याने यंदा उस गाळपास कमी पडणार नाही. हंगाम किमान चार ते साडे चार महिने चालेल, अशी शक्यता आहे.  बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रांची खरेदी केल्यामुळे ऊसतोड मजुरांचीही समस्या मिटली आहे. ऊस तोडीच्या टोळ्याही आता दाखल होऊ लागल्या आहेत.

यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. 2020-21 मध्ये 1 कोटी 80 लाख टन उसाचे गाळप झाले होते. गतवर्षी 2 कोटी 18 लाख टनापर्यंत गाळप झाले होते. यावर्षी 2 कोटी 25 लाख टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. यावर्षी नर्सरीला ऊस जात असल्यामुळे गतवर्षा इतकाच कारखान्याला ऊस मिळणार आहे.

यावर्षी साखर आयुक्त कार्यालय बेळगाावात सुरु झाल्यामुळे साखर कारखानदार आणि शेतकर्‍यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यास मदत होत आहे.

जिल्ह्याचा साखर उद्योग एक नजर

यंदा जिल्ह्यात गळीत हंगाम घेणारे कारखाने ………       28
एकूण साखर कामगार सुमारे ……………………            15 ते 20 हजार
ऊस क्षेत्र …………………………………….                       3 लाख 17 हजार हेक्टर
गतवर्षीचे गाळप ………………………………                  2 कोटी 18 लाख 2 हजार टन
साखरेचे उत्पादन ………………………………                 2 कोटी 20 लाख 21 हजार क्विंटल
यावर्षी ऊस बिलाचा अंदाज …………………….            6 हजार कोटी रुपये
एकूण ऊस उत्पादक …………………………..               2 लाख
जिल्ह्यातून महाराष्ट्रात जाणारा ऊस ……………….        40 लाख टन

जिल्ह्यातील एकूण ऊस क्षेत्र
(लाख हेक्टरमध्ये)
सन ऊस क्षेत्र
2017-18 1.98
2018-19 2.36
2019-20 2.55
2020-21 2.65
2021-22 2.89

यावर्षी ऊस उत्पादन चांगले आहे. कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरु केल्यास रिकव्हरी चांगली होईल. गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे.
– चंदन शिरगावकर, व्यवस्थापकीय संचालक,
उगार शुगर वर्क्स लि.

उसाचे क्षेत्र यंदा वाढले आहे. पीकही चांगले आहे. कारखान्यांनी दर जाहीर करुन कारखाने सुरू करावेत, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर एक रकमी एफआरपी द्यावी.
– शशिकांत जोशी,
नेते, ऊस उत्पादक संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT