बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या महापालिका स्थायी समितीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. चारही स्थायी समितीत प्रत्येकी सात सदस्यांची निवड करण्यात आली असून, शुक्रवारी (दि. 7) अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
स्थायी समिती सदस्य निवडणूक सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. अखेरच्या दिवशीपर्यंत निवडीचा फॉर्म्युला ठरत नव्हता. अखेर भाजपने दबाव वाढवल्यामुळे 5-2 या फॉर्म्युल्यावर एकमत झाले. त्यानुसार भाजपचे पाच आणि काँग्रेसचे दोन सदस्य प्रत्येक स्थायी समितीवर निवडले आहेत. या सदस्यांचे लक्ष आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे आहे.
महापालिकेत अर्थ व कर, आरोग्य व सामाजिक न्याय, नगरनियोजन आणि बांधकाम व लेखा स्थायी समित्या आहेत. यापैकी अर्थ व कर, आरोग्य व बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या समितीत सातत्याने घडामोडी घडत असल्याने त्या आपल्या ताब्यात राहाव्यात, असा अनेकांचा प्रयत्न असतो. स्थायी समिती बैठकीत झालेल्या निर्णयांवरच सर्वसाधारण सभेत ठराव होत असतो. त्यामुळे, सध्या निवड झालेल्या सदस्यांकडून अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
या चारही स्थायी समित्यांवर भाजपचे सदस्य अध्यक्षपदी असणार आहेत. महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार 7 जुलै रोजी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे.