बेनाडी; पुढारी वृत्तसेवा : आडी येथील संजीवनीगिरी डोंगरावरील मल्लिकार्जुन देवाची श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारची यात्रा श्रीफळांच्या वर्षावात भक्तिमय वातावरणात पार पडली.
मल्लिकार्जुन डोंगरावर शिवलिंगावर रोज पहाटे 11 हजार बेल वाहण्यात येत आहेत. सोमवारी भाविकांच्या उपस्थितीत पहाटे गरम पाण्याने शिवलिंगाची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर मंत्रोचाराच्या गजरात महाभिषेक घालण्यात आला. महाभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाची मूर्ती पुन्हा थंड पाण्याने स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर 11 हजार बेल वाहण्याचा कार्यक्रम झाला.
हर हर महादेव व मल्लिकार्जुन देवाचा जयघोष करण्यात आला. धुप लावणे, आरती, नैवेद्य असा कार्यक्रम झाल्यावर हीच धूप आरती व नैवेद्य मल्लिकार्जुन देवालयाच्या मागे असलेल्या ब्रह्मअंबिका देवीलाही दाखविण्यात येतो. दुपारी श्रींची पालखी मिरवणूक तर दुपारी डोंगरावरील मुख्य कमानीजवळ आल्यावर मानाच्या सासनकाठ्यांसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
श्रींच्या पालखीवर व कमानीच्या भिंतीवर श्रीफळांचा वर्षाव करून पालखीचे स्वागत केले. श्रींची पालखी आल्यानंतर भाविकांनी खारीक-खोबर्याची उधळण करून दर्शन घेतले. पालखी मुख्य मंदिराच्या बाजूने प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये ठेवण्यात आली. सायंकाळच्या सत्रात सदरची पालखी पुन्हा गावातील मंदिराकडे नेण्याचा कार्यक्रम झाला.
पहाटेपासूनच शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण डोंगराच्या पायथ्याला प्रदक्षिणा घालून शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रात्री दोनपासून उपस्थित होते. वाहतुकीला अडथळा न होण्यासाठी यात्रा कमिटी व निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी 5 नंतर श्रींची पालखी पुन्हा गावाकडे रवाना झाल्यानंतर मंदिरातील बेल उतरण्याचा कार्यक्रम झाला. रात्री 8 वाजता आरती झाल्यानंतर देव झोपण्याचा कार्यक्रम होऊन देवालयाचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले. दिवसभर डोंगर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
मल्लिकार्जुन डोंगरावरील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी दत्त मंदिर व परमात्मराज महाराज यांचे दर्शन घेतले. कोल्हापूर जोतिबा सेवा संस्था व प्रजासत्ताक सामाजिक संघटनांकडून भाविकांसाठी खिचडी तर बेनाडीतील भाविकांकडून चहा वाटप करण्यात आला.