बेळगाव

बेळगाव : आकर्षक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  केवळ सहा दिवसांवर यऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहर उपनगरातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. यंदा सजावट साहित्य दरात 10 टक्के दरवाढ झाली असली तरी सदर साहित्य खरेदीसाठी मात्र भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गत दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा भाविकांत मोठा उत्साह आहे. येथील मारुती गल्‍ली, गणपत गल्‍ली, पांगुळ गल्‍ली, खडेबाझार, नरगुंदकर भावे चौक येथे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.

यंदा कर्नाटक सरकारने थर्माकॉलवर बंदी घातली आहे. त्यामुळे प्लायवूडच्या मकरना मागणी आहे. साधारणपणे 1100 ते 1800 रूपायंपर्यंत सदर मकर उपलब्ध आहेत. तयार कापडी मंडप खरेदीचीही क्रेझही वाढत आहे. सध्या प्लास्टिक पाईपपासून तयार करण्यात आलेल्या कापडी मंडपाला मोठी मागणी आहे. लहान जागेत आकर्षक कापडी मंडप आकर्षक बसत असल्याने मोठी मागणी आहे. बाजारात यंदा आर्टीफिशियल फ्लॉवर बंचचेही खास आकर्षण आहे. आरास आकर्षक करण्यासाठी याला विशेष मागणी आहे. याचा दर 400 ते 1 हजार रुपयापर्यंत आहे.

अलिकडील काही वर्षात गणेश मूर्ती सजवण्यावर मोठा भर देण्यात येत आहे. यासाठी खास कारांगिरांकडून कुंदन वर्क करवून घेण्याचा कल वाढत आहे. मूर्तीपेक्षाही जादा खर्च या कुंदनवर करण्याचा कल दिसून येत आहे. आराससाठी विविधरंगी फुलांच्या माळा उपलब्ध आहेत. फुलांच्या आकारानुसार 20 ते 100 रु. असे या माळांचे दर आहेत.

विविध प्रकारच्या लेस उपलब्ध असून गणेश मूर्तीच्या हातामध्ये आकर्षक मोदक ठेवण्याला अधिक पसंती दिली जात आहे. यासाठी बाजारात चांदीचा साज असणारा मोदक उपलब्ध आहेत. यंदा पहिल्यांदाच असे मोदक बाजारात आले असून एक मोदक 200 रु. आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT