बेळगाव

बेळगाव : आंबेवाडीत खुनी हल्ला; कुटुंबातील चौघांना अटक

अनुराधा कोरवी

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा : आंबेवाडी (ता. बेळगाव) येथे तरुणावर खुनी हल्ला करणार्‍या चौघांना काकती पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास आंबेवाडी येथे ही घटना घडली. मनोहर पांडू तरळे (वय 42, रा. शांतीनगर, आंबेडवाडी) असे जखमीचे नाव आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये दशरथ गंगाराम तरळे (वय 28), गंगाराम लुमाण्णा तरळे (वय 70), उमेश गंगाराम तरळे (वय 30) व शांता गंगाराम तरळे (वय 60), चौघेही रा. शांतीनगर, आंबेवाडी) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तरळे कुटुंबात शेताच्या वाटणीवरून वाद आहे. घरे देखील आजूबाजूला असून येथे फिर्यादी मनोहर याच्या मालकीची खुली जागा आहे. संशयितांची जनावरे चरण्यासाठी सोडली असता ती या मोकळ्या खुल्या जागेत गवत खाण्यासाठी शिरली. यावेळी फिर्यादीने तुमची जनावरे आमच्या जागेत का? अशी विचारणा केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हे भांडण वाढत जाऊन संशयिताने मनोहर याच्यावर हल्ला करत चाकू, काठी, सळई व दगडाने मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची काकती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांनी सहकार्‍यांसह जखमीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. रविवारी रात्री सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता सर्वांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. उपनिरीक्षक मंजुनाथ तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT