निपाणी; मधुकर पाटील : गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीच्या जागेत काम करावे लागणार्या येथील हेस्कॉमला आता ग्रामीण व शहरसाठी स्वतंत्र विभागीय कार्यालयाची नूतन इमारत मिळाली आहे. त्यामुळे आता या कार्यालयातील कामाचा विस्तार वाढणार आहे. येथील मुख्य कार्यालय आवारात सुमारे पाऊण कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे. शिवाय मुख्य कार्यालयाच्या समोर सिक्युरिटी केबिन व परिसराचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने या कार्यालय परिसराचा लूक बदलला आहे.
निपाणी तालुका हेस्कॉम कार्यालयाकडे सध्या परिसरातील 48 गावांची जबाबदारी असून सुमारे 75 हजार ग्राहक संख्या आहे. त्यानुसार समाधीमठ, जत्राट, बेनाडी, कोगनोळी, खडकलाट येथील सबस्टेशन अंतर्गत शहर व परिसरातील गावांसह उद्योजक व्यावसायिकांना वीजपुरवठा केला जातो. हेस्कॉम कार्यालय ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये कार्यरत होते. गेल्या दहा वर्षांपूर्वी केवळ मुख्य अभियंत्यांसाठी कार्यालयाची उभारणी करण्यात आली. यातच दुसर्या बाजूला प्रशासकीय कामकाजाला स्वतंत्ररित्या हॉल बांधून देण्यात आला.
ग्राहक संख्या वाढत चालल्याने शिवाय निपाणी स्वतंत्र तालुका झाल्याने उपलब्ध इमारत व कार्यालयाची अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने येथील हेस्कॉम कार्यालयाच्या शहर व ग्रामीण विभागीय कार्यासाठी स्वतंत्ररित्या निधी मंजूर केला. या मंजूर रकमेतून सध्या देखणी वास्तू तसेच मुख्य कार्यालयासमोर सिक्युरिटी केबिनही बांधण्यात आली आहे.
ब्रिटिशकालीन व जुन्या कौलारू इमारतीमध्ये कार्यरत असलेले हेस्कॉमचे कामकाज आता स्वतंत्ररीत्या चालणार आहे. दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली स्वतंत्र इमारत ही मुख्य अभियंत्यांच्या वापरासाठी राहणार आहे, तर जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीचे नूतनीकरण करून ती रेकॉर्ड रूम म्हणून वापरली जाणार आहे. सध्या हेल्पलाइन सेवा देणारी जुनी रूमही पाडली जाणार आहे.
सध्या ग्रामीण व शहरसाठी बांधण्यात आलेली विभागीय कार्यालयाची इमारत पूर्ण झाली आहे. यामध्ये कार्यालयातील फर्निचर व इतर किरकोळ कामे सुरू आहेत. त्यामुळे या इमारतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे.
विशेष बाब म्हणजे कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिक्युरिटी केबिन नसल्याने या परिसराची सुरक्षितता धोक्यात आली होती, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वतंत्र सिक्युरिटी केबिनसाठीही निधी मंजूर केला असून त्यातून सिक्युरिटी केबिनही बांधण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त तत्कालीन अभियंते शशिकांत चिकाडे व कर्मचार्यांच्या पुढाकाराने या परिसरात गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे.
शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांची होणारी अडचण व कार्यालयीन कर्मचार्यांची कोंडी लक्षात घेऊन राज्य सरकारने ग्रामीण व शहरसाठी विभागीय कार्यालय इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता. या मंजूर रकमेतून ही इमारत बांधली असून आता स्वतंत्र कामकाजामुळे अनेक समस्या दूर होणार आहेत.
– अक्षय चौगुले मुख्य अभियंता, हेस्कॉम निपाणी