बेळगाव

निपाणी : हालसिद्धनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ

दिनेश चोरगे

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिध्दनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजर्‍या होणार्‍या भाकणूक यात्रेला मंगळवार दि. 11 पासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा दि.15 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवस चालणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी तसेच कुर्ली व आप्पाचीवाडी येथील ग्राम पंचायतीने सर्व तयारी पूर्ण केली असून निपाणी ग्रामीण पोलिसांच्या वतीने विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 9 वा. कुर्ली येथून आप्पाचीवाडी येथे श्रींची पालखी, सबिना सोहळा, निघणार असून प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वा. कर बांधून यात्रेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, मंगळवार व बुधवारी सलग दोन दिवस रात्री ढोल जागर, श्रींची पालखी प्रदक्षिणा तर दि. 13 रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा, उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक होणार असून 14 रोजी शुक्रवारी या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी दिवसभर महानैवेद्य रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर उत्तर रात्री मुख्य दुसरी भाकणूक होणार आहे. दि. 15 रोजी सकाळी 7 वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी भरणार्‍या या नाथांच्या भोंब पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. नाथांचे निस्सीम भक्त भगवान डोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांच्या मुखावाटे नाथांची भाकणूक ऐकवली जाते. सत्यात उतरत जाणार्‍या नाथांच्या भाकणुकीला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविक श्रद्धेने उपस्थिती लावतात.

जादा बसेसची सोय

यात्राकाळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय केली आहे. दरम्यान, यात्राकाळात पाच दिवस शाळा आवारात हालसिध्दनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT