File Photo 
बेळगाव

निपाणी शहराला भविष्यात पाणी टंचाईची भीती; विजय जाधव यांचा दावा

Shambhuraj Pachindre

निपाणी पुढारी वृत्तसेवा: निपाणी शहराला भविष्यात पाणीटंचाई जाणवणार असल्याची भीती निवृत्त अभियंता विजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत निपाणी नगरपालिका पिण्याच्या पाण्याचा कोटा वेदगंगेतून उचलण्यास शासनाची मंजुरी घेत नाही. तोपर्यंत सदर पाणी योजनेला कायदेशीर हक्क प्राप्त होत नाही, हे वास्तव असल्याची माहिती त्यांनी दै. 'पुढारी'ला दिली.

जाधव म्हणाले, आज निधीअभावी काळम्मावाडी कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने हंगामी स्वरूपात निढोरी व बिद्री शाखेचे पाणी वेदगंगेत व दूधगंगेत सोडले जाते. तशी कायमस्वरुपी तरतूद नाही. प्रकल्प अहवालाप्रमाणे कालवे पूर्ण होताच वेदगंगेत पाणी सोडणे बंद होणार आहे. पाणी बंद झाल्यानंतर धावपळ करणे टाळायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.

कृष्णा खोर्‍यातून कर्नाटकाला मिळालेल्या दुसर्‍या टप्प्यातील 173 टीएमसी पाण्याचे उपखोरेनिहाय वाटप करताना उपखोरे क्र.1 दूधगंगा व वेदगंगा यासाठी पाण्याची काहीच तरतूद केलेली नाही. मात्र या वाटपातून अद्याप सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते नद्यातून न्यूनतम प्रवाही म्हणून शिल्लक ठेवले आहे. पहिल्या टप्प्यातील 734 टीएमसी पाण्याचे वाटप करताना न्यूनतम प्रवाही पाण्याची तरतूद केलेली नव्हती. मग आताच का केली? याचा अर्थ शिल्लक पाणी नदी पात्रात राखीव ठेवले आहे. ते भविष्यात आवश्यकतेनुसार वाटप केले जाईल. या शिल्लक पाण्यातून एखादा टीएमसी पाणी निपाणी परिसरासाठी मंजूर करून घेऊन आपल्या हक्काचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता कायद्याने मिळविणे शक्य होणार आहे.

निपाणी या नावावरूनच या गावात पाण्याची टंचाई असल्याचे दिसून येते. पाण्याची टंचाई लक्षात घेऊनच निपाणीचे प्रसिद्ध तंबाखू उद्योजक कै. देवचंदजी शाह हे नगराध्यक्ष व मुंबई प्रांताचे एमएलसी असताना त्यांनी अर्जुनीच्या ओढ्यावर बंधारा बांधून जवाहर तलावाची निर्मिती केली. त्यामुळे निपाणीला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झाला. त्याला आता 65 वर्षे झाली.

दरम्यानच्या काळात शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन 1990 नंतर डॉ. अच्युत माने नगराध्यक्ष असताना वेदगंगेतून पाणी उचलून ते थेट जवाहर तलावात सोडण्याचे नियोजन केले होते. आजही सदर योजना नगरपालिकेने पाणी कोटा मंजूर करून न घेतल्याने अपुरीच आहे. काळम्मावाडीतून कर्नाटकाला मिळणारे चार टीएमसी पाणी निढोरी, बिद्री, दत्तवाड व कुरूंदवाड शाखा कालव्यांमार्फत वेदगंगा ते पंचगंगा यामधील कर्नाटकाच्या क्षेत्राला पुरविले जाणार आहे. सदर प्रकल्पांतर्गत निपाणी शहर अथवा वेदगंगा काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याची किंवा वेदगंगा उजव्या काठावरील क्षेत्राला सिंचनासाठी पाण्याची तरतूद करावी, अशी माहिती जाधव यांनी दिली.

शासन दरबारी हवेत प्रयत्न

शासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी कोटा मंजूर करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्री शशिकला जोल्ले यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडून वेदगंगेच्या उजव्या तीरावरील निपाणी परिसरासाठी सिंचनासाठी व पिण्यासाठी वेगळी तरतूद करून घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT