बेळगाव

निपाणी : दोन अट्टल घरफोड्यांना अटक; दुचाकी, लोखंडी हत्यार जप्त

अनुराधा कोरवी

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते अट्टल घरफोडे निघाले. राजेसाहेब गुलाब नायकवाडी (वय ४२, रा. सोलापूर ता. हक्केरी) व दस्तगीर कादरसाब मलोडी (वय ५३, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून दुचाकीसह लोखंडी हत्यार असे साहित्य जप्त करण्यात आले.

खडकलाट पोलिसांनी ही कारवाई केली. सीपीआय एस. सी. पाटील व उपनिरीक्षक शिवानंद बन्नीकोप हे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने रात्रीची गस्त घालत असताना राजेसाहेब व दस्तगीर हे दोघेजण संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपण खडकलाट शिरगाव व परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआय पाटील यांनी दिली.

SCROLL FOR NEXT