निपाणी; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या 20 मिनिटांत चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून 3 लाख 50 हजार रुपये व साहित्य लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शहराच्या मध्यवर्ती भागातील रहदारीच्या रोडवरील कित्तूर राणी चन्नमा सर्कलसमोर असलेल्या सुपर बझारमध्ये मंगळवारी मध्यरात्री हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले
आहेत.
कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल समोरील संघवी बंधू यांच्या बिल्डिंगमध्ये सुपर बझार आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्री व्यवस्थापक सचिन गायकवाड सुपर बझार बंद करूने गेले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी ते आले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. गायकवाड यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून ड्रॉवरबमधील सुमारे 3 लाख 50 हजार रुपये, दाढीसाठी लागणारे साहित्य तसेच बिस्कीट लंपास केले. पंधरवड्यापूर्वी पंतनगर येथे झालेल्या 63 तोळे घरफोडीचा तपास लागला नसताना पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढल्याने पोलिसांसमोर ऐन गणेशोत्सवामध्ये तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मंगळवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी हातचलाखी करून 20 मिनिटांत रोकड व साहित्य लांबून पोबारा केला. यावेळ सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या छबी कैद झाली असून चोरट्यांकडून सोबत असलेल्या मोबाईलचाही वापर झाला आहे.