निपाणी; पुढारी वृत्तसेवा : ट्रक चालक मित्राने संगनमताने दुसर्या ट्रक चालकाच्या सख्ख्या भावाच्या मदतीने अन्य एका मित्राला अशा तिघाजणांना जाळ्यात ओढून त्यांच्या मदतीने सुमारे 25 लाख रुपये किंमतीच्या 41 दुचाकी चोरून त्या कमी किंमतीत विकल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांसह चौघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या सर्व दुचाकी जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस डॉ. संजीव पाटील यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
युवराज संजय पोवार (वय 35) विनायक तानाजी कवाळे (वय 28) रा. कुर्ली तर दयानंद संभाजी शेटके (वय 36) तानाजी संभाजी शेटके (वय 39) रा. हदनाळ ता. निपाणी अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.
कुर्ली येथील युवराज पोवार हा ट्रक चालक असून त्याने ट्रकचालक मित्र तानाजी शेटके याच्याशी मैत्री करून परिसरात दुचाकी चोरण्याचा कट रचला. त्यानुसार युवराज व तानाजी यांनी विनायक कवाळे व दयानंद शेटके यांनाही आपल्या जाळ्यात ओढून या चौघांनी 2020 सालापासून दुचाकी चोरून त्या कमी विकण्याचा चोरून व्यवसाय चालवला होता. युवराजने निपाणी, संकेश्वर, सदलगा, गोकाक, यमकनमर्डी, कागवाड, अंकली, हुक्केरी व कागल व कोल्हापूर परिसरातील विविध गावातील तब्बल 41 दुचाकी चोरून त्या कमी किमतीत विकल्या होत्या.
दरम्यान दि.30 रोजी रात्री निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार हे गस्त घालत असताना युवराज पोवार हा महामार्गावरील आप्पाचीवाडी फाटा येथून कुर्लीकडे जात होता. यावेळी उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी दुचाकीवरून जाणार्या युवराजला थांबवून विचारणा केली असता त्याने चौघांच्या मदतीने दुचाकी चोरून विकल्याची कबुली दिली. त्यानुसार युवराजला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने तब्बल 41 दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी विनायक, दयानंद, तानाजी या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौघांनीही याची कबुली दिली. त्यानुसार 24 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 41 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. यामधील 24 दुचाकी या कर्नाटकातील तर 17 दुचाकी या नजीकच्या कागल व कोल्हापूर परिसरातील असून यामधील 34 दुचाकी मालकांची ओळख पटली आहे. संबंधित दुचाकी मालकांकडे असलेल्या कागदपत्राच्या आधारे खातर जमा करून संबंधितांना न्यायालयाच्या परवानगीने या दुचाकी परत केल्या जातील, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली.
ही कारवाईत उपाधीक्षक डीएसपी बसवराज यलीगार यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक अनिलकुमार यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी शेखर असोदे, श्रीशैल गळतगे, मंजुनाथ खोत, एम. एफ.नदाफ, ए व्ही. चंदनशिवे, आर. एफ. गोरखनाथ, प्रशांत कुदरी,रघु मेलगडे, संदीप गाडीवडर, एस. एल. काडगौडर, के. डी. हिरेमठ, प्रभू सिदाठगीमठ यांनी केली. या पथकाचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी अभिनंदन व कौतुक केले. दरम्यान अटक करण्यात आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना निपाणी न्यायालयपुढे हजर केल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
पोलिसांनी रविवारी अटक करण्यात आलेला संशयित चौघांपैकी दयानंद व तानाजी शेटके हे सख्खे भाऊ आहेत. सध्या दयानंद हा ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत असून तानाजी हा ऊस तोडणी मजूर म्हणून परिचित आहे.
कर्नाटकातील 24 तर महाराष्ट्रातील 17 दुचाकी
रविवारी निपाणी ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण 41 दुचाकीपैकी कर्नाटकातील 24 तर महाराष्ट्रातील 17 दुचाकी आहेत यामध्ये 34 मूळ दुचाकी मालकांची ओळख पटली असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास चालवला आहे.
25 हजारचे बक्षीस जाहीर
दुचाकी चोरणार्या या टोळीच्या छडा लावून तब्बल 41 दुचाकी जप्त केल्या आहेत.दरम्यान निपाणी पोलिसांची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी असून हे प्रकरण उघडकीस आणणार्या संबंधित तपास पथकासाठी 25 हजारचे बक्षीस देण्यात येणार असून सर्व तपास पथकातील कर्मचार्यांना प्रमाणपत्र देऊन जिल्हा पातळीवर गौरविण्यात येणार असल्याचेही जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. पाटील यांनी सांगितले.