बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : बारा दिवसांपूर्वी चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी मुंबईहून मावशीकडे आलेला रोशन डेव्हिड (वय 20) याच्यासह चौदा वर्षांच्या युवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अल्पवयीन युवकाच्या मामाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कॅम्पमधील एका भाडोत्री घरात आई व तिची चार वर्षांची मुलगी राहतात. बालिकेचे वडील परदेशात नोकरीला आहेत.
शेजारी आणखी एक महिला भाडोत्री राहते. त्या महिलेच्या बहिणीचा मुलगा रोशन हा महिन्यापूर्वी मुंबईहून मावशीकडे राहण्यासाठी आला होता. दहा दिवसांपूर्वी सदर बालिका अंगणात खेळत होती. यावेळी रोशनने तिला खाऊचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. कॅम्प पोलिसांत घटनेची नोंद झाली असून, निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.
ही घटना घडल्यानंतर सदर बालिकेने आपल्या आईला पोट दुखून त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे आईने जेव्हा तिला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने घाबरलेल्या बालिकेच्या आईने ही बाब पोलिसांना न सांगता गुप्त ठेवली.
परंतु, तब्बल बारा दिवसांनंतर हे प्रकरण समोर आल्याने कॅम्पमधील युवकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत संशयिताला अटक करण्याची मागणी करीत पोलिस स्थानकासमोर धरणे धरले.
ज्यांच्या घरात ही दोन्ही कुटुंबे भाडोत्री राहात होती, त्या घराच्या मालकाला जमावाने घरात घुसून बेदम मारहाण केली. शहबाजुद्दीन यासीफ बॉम्बेवाले (41, रा. अॅन्थोनी स्ट्रीट) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु, ते जखमी असल्याने याबाबतचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे कॅम्पचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी सांगितले.
अत्याचार प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चौदा वर्षाच्या मुलाचा समावेश असून, त्याचे या घटनेत नेमकी भूमिका काय, ही माहिती अद्याप पोलिसांनाही नाही.
फिर्यादीत दोघांची नावे असल्याने दोघांवर एफआयआर दाखल केला आहे, त्यान काय केले, हे तपासानंतरच समोर येईल, असे खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांनी सांगितले.
सदर मुलगा घरमालकाचा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रोशनला ताब्यात घेऊन त्याची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच सुमारे 100 जणांचा जमाव कॅम्प पोलिस ठाण्यासमोर जमला. सदर संशयिताला आमच्या ताब्यात द्या, असे हे तरुण म्हणत होते. याचवेळी नेमके एक वकील ठाण्यात आले.
ते वकील या संशयिताला सोडविण्यासाठी आले आहेत, असे समजून जमाव घर मालकाच्या घराकडे गेला. त्यानंतर त्यांना घरातून बाहेर आणत रस्त्यावर जबर मारहाण केली.
यामुळे या घराजवळ तसेच पोलिस ठाण्यासमोरही काही काळ तणाव निर्माण झाला होता. खडेबाजार विभागाचे एसीपी ए. चंद्राप्पा, खडेबाजारचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह पोलिसांनी येथील जमावाला पांगवले.