बेळगाव

देशाच्या राजकारणात उलथापालथ होईल; हालसिद्धनाथाची भाकणूक

अनुराधा कोरवी

खडकलाट : पुढारी वृत्तसेवा : राजकारणात पैसा न खाणारी माणसे शोधूनही सापडणार नाहीत. भ्रष्टाचाराला उधाण येईल. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारण्याचे प्रकार वाढतील. देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल. सीमाप्रश्नावरून मोठा गोंधळ होईल. मोठ-मोठे नेते भ्रष्टाचार घोटाळ्यात अडकतील, अशी भाकणूक वाघापूरचे कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली.

कृष्णात डोणे महाराज पुढे म्हणाले, अतिरेकी दंगे आणि बॉम्बस्फोट होतील. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल. खडकलाट तळ्याच्या काठावर माझी वस्ती असून येथील भाविकांवर माझी सदैव कृपा आहे. खडकलाट येथील भाविकांनी एकीने व सत्याने वागावे. गर्व करू नये. देवाची सेवा करशिला तर मेवा खाशिला. उसाला आणि तंबाखूला सोन्याचा भाव मिळेल. मेंढीच्या पोटास पोरगा जन्माला येईल. साखरेच्या दरात चढ-उतार होईल. बारमाही पाऊस पडेल.

उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल. शेतकरी चिंतेत राहील. गाईचे वासरू गाईला ओळखणार नाही. माणसाला बुद्धी जास्त व आयुष्य कमी हाय. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल. विज्ञानाची प्रगती माणसावर अवलंबून राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी-मंदी राहील. कर्नाटकाच्या जलाशयाला भगदाड पडेल. नदीकाठचा भाग जलमय होईल. नदीकाठची जमीन ओसाड पडेल. भारतमातेचा जयजयकार होईल. उगवत्या सूर्याच्या संकट हाय. माणसाला माणूस ओळखणार नाही. दिवसा ढवळ्या दरोडे पडतील. सातारा व कोल्हापूरच्या गादीवर फुले पडतील. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. असेही त्यांनी सांगितले.

कृष्णात डोणे महाराज- वाघापूरकर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आला. हालसिद्धनाथ देवाची वार्षिक यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. अखेरच्या दिवशी हेडाम खेळ व हालसिद्धनाथ देवाची भाकणूक पार पडली. ज्ञानेश्वरी पारायण सोहळाही पार पडला. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

SCROLL FOR NEXT