बेळगाव

तुष्टीकरण नव्हे, तृप्तीकरण हेच भाजप सरकारचे धोरण!

मोहन कारंडे

हैदराबाद; वृत्तसंस्था : भाग्यनगरातच (हैदराबादेत) सरदार वल्लभभाई पटेल यांनी 'एक भारत – श्रेष्ठ भारत' ही घोषणा केली होती. आमच्या पक्षाचेही हेच घोषवाक्य आहे. तुष्टीकरणाचे राजकारण संपुष्टात आणून आम्ही तृप्तीकरणाचा मार्ग चोखाळत आहोत आणि याच वाटेवरून पुढेही आमची वाटचाल असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

'एनडीए'च्या राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचेही मोदी म्हणाले. हैदराबादेत शनिवारपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. रविवारी समारोपाच्या कार्यक्रमात मोदींचे भाषण झाले. हैदराबादचा उल्लेख पंतप्रधानांनी 'भाग्यनगर' असा केला. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, घराणेशाहीचे राजकारण आणि ते करणार्‍या राजकीय पक्षांना देश कंटाळलेला आहे. त्रस्त झालेला आहे. असे पक्ष देशात अधिक काळ टिकणार नाहीत. काही पक्षांची तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे. आम्ही भाजप कार्यकर्ता म्हणून या पक्षांची टिंगलटवाळी करू नये. पण या पक्षांनी
केलेल्या चुकांतून बोध घ्यावा.

तेलंगणात येणार भाजप

तेलंगणातील जनता राज्यात भाजपच्या डबल इंजिन सरकारसाठी स्वत:च रस्ता प्रशस्त करत आहे. आज जणू सारे तेलंगणा या मैदानात एकवटल्याचे मला वाटते आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपला मोठे बळ दिले. 'ग्रेटर हैदराबाद' निवडणुकीत तर ऐतिहासिक प्रेम भाजपला प्राप्त झाले. आता तेलंगणाही भाजपकडे सोपविण्याचा ध्यास स्वत: येथील जनतेने धरलेला दिसतो आहे. तेलगू भाषेत शिक्षणावर आम्ही भर देत आहोत. हैदराबाद हे आपल्याला विज्ञाननगर बनवून सोडायचे आहे.

तेलंगणातील शेतकर्‍यांकडून आम्ही एक हजार कोटींचा भात खरेदी केला. येथील शेतकर्‍यांना सिंचनासाठी 35 हजार कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पावर सरकार काम करत आहे. 1500 कोटी रुपयांचे फ्लायओव्हर होणार आहेत. 'हायटेक' शहरात वाहतूक ठप्प होणे त्यामुळे बंद होईल. तेलंगणात रेल्वेचे 31 हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू झाले आहेत, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

कन्हैयालाल हत्येबद्दल बैठकीत शोकप्रस्ताव

बैठकीच्या पहिल्या दिवशी शनिवारी आर्थिक संकल्पांवर, तर रविवारी राजकीय संकल्पांवर चर्चा झाली. देशातील गरिबांच्या आणि देशाच्या आर्थिक कल्याणाचा प्रस्ताव शनिवारी मंजूर करण्यात आला. रविवारी राजकीय संकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला व सर्वसंमतीने तो मंजूर करण्यात आला. उदयपूर येथे कट्टरवाद्यांनी केलेल्या कन्हैयालाल यांच्या हत्येबद्दल शोकप्रस्तावही मंजूर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT