बेळगाव

कर्नाटकात पुन्हा सत्तेचे भाजपचे उद्दिष्ट; अमित शहा आज राज्यात

मोहन कारंडे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पक्षश्रेष्ठींनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस कर्नाटक दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या मॅरेथॉन बैठका होणार असून, निवडणुकीबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक संपण्याची वाट पाहिली जात होती. आता कर्नाटकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. निवडणुकीबाबत डावपेच आखले जाणार आहेत. पक्ष पुन्हा सत्तेवर आणण्याची हाक ते देणार आहेत. बूथ पातळीवर बैठका घेऊन त्यांचा अभिप्राय संग्रहित केला जाणार आहे. प्रदेश भाजपकडून मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. यातील निष्कर्ष पाहून उमेदवार निवडला जाणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणूक होईपर्यंत महिन्यातून तीन ते चारवेळा कर्नाटक दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींचेही दौरे होणार आहेत. अमित शहांचे गुरुवारी रात्री आगमन होईल. बंगळुरातील ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य असेल. शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत पक्षातील प्रमुख नेत्यांशी ते चर्चा करतील. सायंकाळी अरमने मैदानावर होणार्‍या सहकार मेळाव्यात भाग घेणार आहेत. रात्री संघ परिवाराच्या प्रमुख नेत्यांची भेट ते घेतील.

दि.31 रोजी सकाळी पुन्हा प्रदेश भाजप नेत्यांची बैठक ते घेतील. सकाळी 11 वाजता देवनहळ्ळीतील अवती येथे होणार्‍या सौहार्द सहकारी संघाच्या इमारतीचे भूमिपूजन करतील. दुपारी 3 वाजता अरमने मैदानावर आयोजित बूथ पातळीवरील सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीला गेले होते. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्तारास नकार दिला होता. त्यामुळे विस्तार पुन्हा लांबणीवर पडला. परिणामी मंत्रिपदाचा हट्ट धरून बसलेले के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी यांची नाराजी वाढली आहे. गृहमंत्री शहा कर्नाटक दौर्‍यावर येत असून निवडणूक जवळ आली असताना मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा आहे का, याबाबत ते प्रदेश भाजप नेत्यांशी सल्लामसलत करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT