बेळगाव

कर्नाटक विधानसभा निवडणूक : कर्नाटक ‘इलेक्शन मोड’वर

मोनिका क्षीरसागर

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील भाजप सरकारचा कार्यकाळ आणखी वर्षभर आहे. त्याआधीच भाजप, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसह इतर पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या दौर्‍यांमुळे कर्नाटक राज्य 'इलेक्शन मोड'वर गेले असून, दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षांना विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले आहे.

तुमकूर येथील सिद्धगंगा मठाचे दिवंगत शिवकुमार स्वामींच्या 115 व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेते कर्नाटकात आले होते. जयंतीचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील सर्वच नेत्यांना देण्यात आले होते. मात्र, पंतप्रधानांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. गृहमंत्री अमित शहा आणि खा. राहुल गांधी यांनी मात्र एक दिवसाच्या फरकाने जयंती सोहळ्यात सहभाग घेतला. त्याबरोबरच दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या बैठका घेऊन राज्यस्तरीय नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आदेश दिला.

कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच गृहमंत्री शहा यांनी प्रदेश भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक घेतली. काही महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत वादाबाबत काही नेते जाहीर विधाने करत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ-प्राधिकरणावरील नियुक्त्यांसह मुख्यमंत्रिपदाबाबतही नाराजी आहे. काही नेत्यांनी तर जाहीर टीका केली होती. मंत्रिमंडळाच्या सहा जागा रिक्‍त असून, विस्तारात आपल्यालाच मंत्रिपद मिळणार असल्याचे दावेही अनेकांनी केले.

नेत्यांच्या या नाराजीविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेताना अमित शहा यांनी आमदारांना तसेच नेत्यांना जाहीर विधाने करण्यापासून रोखण्याची ताकीद दिली. अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू देऊ नये, असेही सुनावले. पुढच्या सहा महिन्यांत जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करावे, ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेकडे अधिक लक्ष द्यावे, कोणताही दौरा आखताना एकजूट दाखवावी, कोणतेही वाद असतील तर पक्ष पातळीवर मिटवावे, अशा सूचना शहा यांनी दिल्या. पुढील विधानसभा निवडणुकीच्या द‍ृष्टीने आतापासूनच आवश्यक तयारी करण्याचे निर्देश
त्यांनी दिले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रदेश काँग्रेससह विविध नेत्यांची बैठक घेतली. त्यांनी या नेत्यांशी संवाद साधताना सांगितले की, भाजप सत्तेवर असतानाही काही पोटनिवडणुकांमध्ये या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे भाजपला मतदार नाकारत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. हिजाब, हलाल आणि इतर वादांमुळे भाजप अडचणीत आला आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 156 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवा. प्रत्येकाने पक्षासाठी योगदान द्यावे. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे या त्रिमूर्तीच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी घोषित केले.दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी सिद्धगंगा स्वामींच्या जयंतीच्या निमित्ताने विधानसभा निवडणूक तयारीचा बिगुलच वाजवला आहे. त्यामुळे कर्नाटकात मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बैठकांना येईल जोर

गृहमंत्री अमित शहा आणि राहुल गांधींच्या दौर्‍यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा, तालुका पंचायत निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा दोन्ही नेत्यांचा आदेश अंमलबजावणी आणण्यासाठी आता बैठकांना जोर येण्याची शक्यता आहे.

121 विरुद्ध 69

कर्नाटक विधासभेच्या एकूण जागा 224 असून, सध्या भाजपकडे 121, काँग्रेस 69 आणि निजद 32 तर अपक्ष 2 असे आमदारांचे बलाबल आहे. नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, ही निवडणूक सहा महिने आधी घेण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळेच आतापासून तयारी सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT