दांडेली; पुढारी वृत्तसेवा : रहदारीच्या रस्त्यावरच बिबट्याने गायीची शिकार केली. दांडेली-अंबिकानगर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या शिकारीचे व्हिडीओ चित्रण एक क्रूझर चालक दीपक यांनी केले आहे.
क्रूझर चालक दीपक हा प्रवाशांना दांडेली येथे घेऊन येताना मोहिनी सर्कल ते रुद्रभूमी राज्य महामार्गाशेजारी बिबट्याने रस्त्याच्या कडेवर गाय चरत असताना हल्ला करून गायीची मान पकडली. त्यावेळी दीपक यांनी बिबट्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर बिबट्याने गायीच्या नरडीचा घोट घेत गायीस ठार मारले व जवळच्या झुडपात ओढून नेले.
दांडेली अरण्य परिसरात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. हे बिबटे गाय, वासरू, कुत्रे, पाळीव डुकरे यांची शिकार करत आहेत. दांडेली शहराचा काही भाग जंगलाला लागूनच आहे. बैलपार, कोगिलबन, जुने दांडेली, अंबेवाडी, गांधीनगर या भागातील रात्रीच्यावेळी अनेक कुत्री गायब झालेली आहेत. जी गाय बिबट्याने मारली, तिच्या मालकाचे नाव कळलेले नाही, असे अरण्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.