बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
पोलिस उपनिरीक्षक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीने कसून तपास सुरू केला आहे. परीक्षा केंद्रात सेवा बजावलेल्या गुलबर्ग्यातील विविध ठाण्यांच्या 11 पोलिसांची चौकशी केली जाणार आहे. गतवर्षी 3 ऑक्टोबर रोजी पीएसआय परीक्षा झाली होती. त्या दिवशी स्टेशन बाजार ठाण्याचे 3, महिला पोलिस ठाण्याचे 8 जण केंद्रांवर नियुक्त होते. त्या सर्वांची सीआयडी चौकशी होणार आहे. विविध दृष्टिकोनातून सीआयडी तपास सुरू आहे. प्रत्येक चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होत आहे.
या प्रकरणातील संशयित आर. डी. पाटीलची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा यांसह विविध खात्यांमध्ये आर. डी. पाटीलच्या नावे खाती आहेत. ती सर्व खाती सीआयडीकडून तपासण्यात येत आहेत. संशयिताने कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा संशय सीआयडीच्या अधिकार्यांना होता. त्या दृष्टीने त्यांनी खाती गोठवून तपास सुरू केला आहे. त्याने आपल्या नातेवाईकांच्या नावे मालमत्ता नोंदविल्याची शक्यता आहे. याची चौकशीही केली जात आहे.
बंगळूर : पोलिस उपनिरीक्षक गैरव्यवहारप्रकरणी 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये सूत्रधारासह कितीजण सहभागी आहेत, याचा तपास केला जात आहे. यातील तथ्य काय ते लवकरच बाहेर येईल. कुणालाही झुकते माप दिले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, केवळ आरोप करू नयेत. त्याबाबतचे पुरावे असतील तर ते सीआयडी अधिकार्यांना द्यावेत. यामुळे तपास गतीने होईल. विनाकारण आरोप केल्यास तथ्य समजणार नाही. या प्रकरणाचा छडा लावणे आवश्यक आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास तपास लवकरच पूर्ण होईल.